बहिष्कृत भारतावरील अभिप्राय - Page 484

४३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

(४) निजाम विजय-तारीख १२-४-२७

गेल्या तारीख तीन एप्रिल पासून मुंबई येथें अस्पृश्यांच्या उन्नतीकरितां बॅ. आंबेडकर यांच्या संपादकत्वाखालीं 'बहिष्कृत भारत' नांवानें एक पाक्षिक निघण्यास सुरवात झाली आहे. सदरहू नियतकालिकाचा पहिलाच अंक जो आमच्याकडे आला आहे त्यावरून पहातां पाक्षिकाचें धोरण कसें असणार याचा उलगडा होतो. पाक्षिकांतील कोणताही लेख वाचला असतां संपादकाच्या मनाची अंगीकृत कार्यांविषयींची तळमळ त्यांत स्पष्टपणें व्यक्त झालेली आढळते. हिंदुस्थानांतील अस्पृश्य समाजापुढें केवळ हिंदूंतील वरिष्ठ जातीशी झगडण्याचाच प्रश्‍न नसून ब्राह्मण वगैरे वरिष्ठ जातीशिवाय संस्कृतीने त्यांच्याबरोबरीचे असतांनाहि त्यास हात अंतरावर ठेवूं पहाणारे ब्राह्मणेतर, स्वधर्मीयांची बऱ्यावाईट कोणत्याही रीतींनें संख्या वाढविण्याकरितां बद्धपरिकर झालेले मुसलमान व बाह्यात्कारी एका जातीच्या हितार्थ जपण्याचा आव आणतांनाच मनांतून ब्राह्मण, ब्राह्मणेतर, अस्पृश्य व मुसलमान इत्यादि सर्वांस एकच जात्यांत भरडून काढूं इच्छिणारे सरकार व सर्वाशींच त्यास झगडावें लागणार आहे. व ही गोष्ट संपादकाच्या ध्यानी असावी असें दिसतें. पत्रांतील लेखांची भाषा अत्यंत जोरदार, सडेतोड व केवळ निर्भेळ सत्याशिवाय कशाचीही दरकार न करणारी अशी आहे. व हेंच धोरण पत्रकर्ते जोपर्यंत कायम ठेवतील तोपर्यंत ते आपलें उद्दिष्ट सिद्धीस नेण्याचें यश खात्रीनें मिळवतील असें वाटतें. कालाच्या विचित्र करणीनें वरिष्ठ, कनिष्ठ किंवा अस्पृश्य अशा हिंदु जातींतील कमी अधिक प्रमाणाने कां होईना सर्वत्र समाजाची अधोगति झालेली आहे. परिस्थितीने सर्वांच्याच नेत्रांत झणझणीत अंजन पडत आहे, व त्याचा परिणाम उशिराने कां होईना पण दृष्टि निवळण्यांतच होईल याबद्दल शंका नाहीं. तरी आमच्या बंधूंनी विकारवश न होतां आपली चळवळ सडेतोडपणानें व केवळ आपले हक्क-खरेखुरे मानवी अधिकार-दृष्टीपुढें ठेवून चालवावी व कोणत्याहि परिस्थितींत परधर्मीयांच्या जाळ्यात न सांपडण्याची खबरदारी घ्यावी, व त्यांच्या पुढाऱ्यांनी त्यास याच सरळ मार्गाने न्यावे. पत्राचे आजचें धोरण पहातां तें आमच्या वरील विचाररणीला धरून राहील अशी आशा करण्यास जागा आहे. व म्हणूनच इतक्या कळकळीने आम्ही सदरहू पत्राच्या चालकांचे अभिनंदन करतों. अस्पृश्यसमाज हा हिंदुसमाजाचा महत्त्वाचा अवयव आहे-नाहीं, खऱ्या हिंदु धर्माच्या भावी जीवनाचा तो पाया-आहे ही गोष्ट यापुढें तरी कोणी विसरूं नये.

(५) गोब्रास-तारीख ८-५-२७

'बहिष्कृत भारत' पाक्षिक पत्र. संपादक डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, बार-एँट-लॉ, परळ, मुंबई. वा. व. ३ रुपये. स्वकीय समाजांत जागृति करून