बहिष्कृत भारतावरील अभिप्राय - Page 486

४४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ते जर एखादें राज्य स्थापते तर तेहि कधींच स्पृश्य होऊन गेले असते. पण दुर्दैवाने तसें घडलें नाही |

अस्पृश्यता निवारणार्थ व अस्पृश्य समाजाच्या उन्नत्यर्थ एका स्वतंत्र पाक्षिकाची स्थापना करण्यांत आली हें ठीकच झालें. पण पक्षसमर्थन करणें म्हणजे प्रतिपक्षियांना शिवीगाळ करणें हें मात्र नव्हे. शास्त्रवाद, बुद्धिवाद व युक्तिवाद जे असतील ते खुशाल करावे. पण शिष्टाचाराचे उल्लंघन होता उपयोगी नाहीं. अभिप्राय मागण्यांत आल्यावरून आम्हीं आपला अभिप्राय दिला आहे. पण लेखन शिवीगाळीच्या स्वरुपाचें आतांच दिसू लागल्यामुळें परत भेट मात्र देतां येत नाही ह्याबद्दल दिलगिरी वाटते. बदललेल्या परिस्थितीनुसार रूढी वाटल्यास बदलावी. पण दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेल्या भगवान मनूवर

आज ताशेरा झाडणें म्हणजे ह्यासारखा मूर्खपणा दुसरा कोणताच नाही असें आम्ही

समजतो.

(८) श्रीयुत एम्‌. एस. मुंडले, बी. ए.,एलएल.बी., वकील, मोर्शी (वऱ्हाड)

ता. १३ मे १९२७.

श्री. 'बहिष्कृत भारत' कर्ते यांस,

सा. न. वि. वि.,

बहिष्कृत भारताच्या दुसऱ्या व तिसऱ्या अंकातील अग्रलेखाबद्दल मी आपले मनःपूर्वक अभिनंद करतों. या लेखांतील विचारसरणी जशी जोरदार व तर्कशुद्ध आहे तशीच भाषाहि ठसकेदार पण अकृत्रिम आणि परिणामकारी पण भारदस्त आहे, अश्लील लिहिल्याशिवाय परिणामकारक लेख लिहिणें अशक्य आहे असें ज्यांना वाटतें अशा पत्रकर्त्यांना आपले पत्र मार्गदर्शक होईल अशी मला आशा आहे.

बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.