महाडला सत्याग्रह पुकारा - Page 487

परिशिष्ट-१७
महाडला सत्याग्रह पुकारा

महाड येथें अस्पृश्यांनीं चवदार तळ्यांतलें पाणी घेऊन आपला जन्मसिद्ध हक्क बजावला म्हणून तेथील कांही भटजी, शेटजी व भटाळलेले इतर ब्राह्मणेतर यांनी अस्पृश्यांना मारले. या बाबतींत वर्तमान पत्रांतून निरनिराळ्या बाजू पुढें येत आहेत. अशा वेळीं अस्पृश्यांनी पुन्हा नेटाने उचल खाऊन त्याच तळ्यावर जाऊन पाणी घेण्याचा हक्क बजवावा. अस्पृश्यांच्या बरोबर आम्हीं येण्यास तयार आहोंत आणि आमच्या सर्व ब्राह्मणेतर बंधूंना अस्पृश्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरतां त्यांचे बरोबर येण्यास विनंती करीत आहोंत. सार्वजनिक विहीरी, हौद, पाणवठे व देवळें या निकडीच्या प्रश्‍नाचा कायमचा निकाल लावून घ्यावा अशी आम्ही सर्व अस्पृश्य पुढाऱ्यांना विनंती करीत आहोंत.

आपले नम्र,

केशवराव जेधे,

दिनकरराव जवळकर.

महाडला सत्याग्रह कसा करावा!

अस्पृश्यांच्या हक्कांची बजावणी, महाड येथें सत्याग्रह करून करावी अशी आम्ही पुनः विनंती करीत आहोंत. सत्याग्रह कसा करावा याबद्दलची आमची योजना या पत्राद्वारे प्रसिद्ध करीत आहोंत.

१. सत्याग्रहाला पूर्ण अनत्याचारी स्वरूप असावें.

२. सत्याग्रह यशस्वी होण्याकरतां कसलाहि ब्राह्मण त्यांत समाविष्ट करून घेऊं नये.

३. एक-दोन माणसें न पाठवितां एकदम हजार-पांचशे माणसांनी मंगलवाद्ये वाजवीत हिंदुधर्मांची पताका घेऊन तळ्यांवर जाऊन पाणी प्यांवे.

४. देवळे, विहीरी व पाणवठे यांत शिरून आपल्या हक्काची बजावणी करण्याची मोहीम सुरूं करण्याकरता खुद्द महाडलाच आणि याच कामाकरता खास परिषद बोलवावी व त्याच दिवशीं मिरवणूक काढून तळ्यावर जावें.