मनोगत - Page 49

मनोगत ५

येईल की, त्यातील बरीचशी पत्रें विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्याना परवा नसते. इतकेच नव्हे तर केव्हां केव्हां त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.

अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इषारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली ; तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहाणार नाही. समाज ही एक नौकाच आहे. व ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून-बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा, किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा ; जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही, आधी नाही तरी मागाहून का होईना जलसमाधी ही घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, प्रत्यक्ष नव्हे, तरी अप्रत्यक्ष पणे तरी नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार आहे ; यात बिलकुल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिक्‌ नये.

हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तभानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणायचे. दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्‍नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्‍नांचा ज्यात खल होतो; त्यात बहिष्कृतांच्या प्रश्‍नांचा सांगोपांग ऊहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्‍य नाही, हेही पण उघड आहे. त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्‍नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे.

खास अस्पृश्यांच्या हिताहिताची चर्चा करण्यासाठी, सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक ही पत्रे उपजली व लयही पावली. हल्ली चालू असलेले बहिष्कृत भारत कसेबसे दिवस काढीत आहे. परंतु वर्गणीदारांकडून . योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वजनोद्धाराचे महत्त्कार्य करण्यास योग्य पंथ दाखवील असे आश्वासन देताना ते अनुभवांती खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे स्वशय निवेदन आटोपते घेतो.

अग्रलेख : मूकनायक, ता. ३१ जानेवारी १९२०.