टिळकांचा सत्कार - Page 50

टिळकांचा सत्कार

टिळक राजकीय व सामाजिक बाबतींत विसंगतपणा व्यक्त करूनच केवळ थांबले नाहींत. मागासलेल्या व अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीला विरोध करण्याच्या कामीं व त्यांना कायमचें अज्ञानांधकारांत अवनतिगर्तेत ठेवण्याच्या कामींहि त्यांनीं गेलीं कित्येक वर्षे आपलें पुण्य खर्ची घातलें आहे. जातवार निवडणुकीचा प्रश्‍न पुढें आला नव्हता तोपर्यंत जातीभेदाचे समर्थन व गीतारहस्य समजून सांगण्याच्या मिषाने उपदेश करून त्यांनीं या वर्गाचे अकल्याण करण्याची खबरदारी घेतली व हेच वर्ग स्वतंत्र प्रतिनिधी मागूं लागतांच त्या योगाने जातिजातीत वैमनस्यें माजून जातीभेद नष्ट होणें लांबणीवर पडेल, या सबबीवर त्यांनीं त्यांचे नुकसान करण्यास कंबर कसली. कायदेमंडळांत जाऊन कुणब्याने नांगर हाकावयाचे नाहींत किंवा वाण्यांनीं तागड्या धरावयाच्या नाहींत असें म्हणणाऱ्या रा. टिळकांचा गौरव पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे हे लोक होऊं देणार नाहींत, हें समजण्याइतके दुरदर्शित्व त्यांच्या चहात्यांना असावयास पाहिजे. त्यांच्या व त्यांच्या अनुयायांच्या विरोधाला भीक न घालता पार्लमेंटरी कमिटीनें जेव्हा स्वतंत्र प्रतिनिधित्वाच्या तत्त्वाला मान्यता दिली तेव्हांच त्यांची लोकमान्यता सर्वस्वी नष्ट झाली हे त्यांच्या लक्षांत यावयास पाहिजे होतें ।

ज्या दीन, हीन, दुबळ्या व असहाय्य अस्पृश्यांविषयीं प्रत्येक जाणत्या व सहृदय हिंदी माणसाचें अंतःकरण तिळतिळ तुटत आहे, त्यांची प्रतारणा करण्यासहि रा. टिळकांनीं कमी केलें नाहीं. अस्पृश्यांच्या उद्धाराला आपली सहानुभूति कमी आहे असें नाहीं, असें विलायतच्या मजूरांना उजळ तोंडानें भासवितां यावें म्हणून त्यांनीं अस्पृश्योद्धाराच्या परिषदेत चांभाराच्या गणपतीची कथा सांगून वेळ मारून नेली ; पण या भाषणापैकीं एक अक्षरहि केसरींत न येईल अशीं त्यांनीं तजवीज केली. पुढें अस्पृश्योद्धाराच्या राजिनाम्यावर (शपथपत्रिकेवर) सही मागण्यांत आली तेव्हां त्यांनीं सर्वस्वी उडवाउडवी करण्याची जबाबदारी घेतली ती निराळीच !

समता, बंधुप्रेम व दीन देशबांधवांविषयीं सहानुभूति या सर्वच बाबतींत उघड उघड माघार खाल्लेल्या या नामधारी पुढाऱ्याचा गौरव करून वरील जगन्मान्य तत्त्वाविषयींचा आपला अनादर कोणी व्यक्त करणार असतील तर बापडे खुशाल