महाड येथें सत्याग्रहाला सुरवात होणार - Page 498

परिशिष्ट-२०
महाड येथें सत्याग्रहाला सुरवात होणार

(लेखक--वा. न. घोरपडे, नागपूर.)

सत्याग्रहाशिवाय महाडच्या तलावाचा प्रश्‍न सुटल्यास पहावा असा डॉ. आंबेडकरांचा प्रथम विचार होता, असें दिसतें. पण प्रतिकाराशिवाय सामाजिक अन्यायाचे प्रश्न सुटणें दुरापास्त आहे हाच अनुभव शेवटीं त्यांना आला असावा. कारण त्यांच्या बहिष्कृत हितकारिणी सभेनें नुकताच एक जाहीरनामा काढून, “महाडला लवकरच सत्याग्रह सुरू होणार आहे तरी त्या सत्याग्रहांत ज्यांना दाखल होण्याची इच्छा असेल त्यांनीं नांवें नोंदवावी” असें जाहीर केले आहे. अखेर महाड प्रकरणाच्या निमित्ताने सामाजिक स्वातंत्र्याच्या झगड्याला प्रत्यक्षपणें तोंड लागणार याबद्दल आम्हांला आनंद होतो. परकीय लोकांपासून स्वराज्याचे हक्क मागणाऱ्या “श्रेष्ठ वर्णीय हिंदूंनी आपल्याच सहा सात कोटी भाईबंदाना सामाजिक व धार्मिक बाबतींत बरोबरीच्या नात्यानें वागवूं नये, उलट पशुंपेक्षाही नीच तऱ्हेची वागणुक त्यांना द्यावी हा दैवदुर्विलासाचा कडेलोट होय." साध्या माणुसकीच्या वागणुकीकरितां आपल्याच लोकांविरुद्ध सत्याग्रहाच्या रूपानें विरोधी झगडा करण्याचा प्रसंग यावा यापेक्षां अधिक शोचनीय गोष्ट कोणती ? पण परिस्थितीपुढें इलाज नाहीं. सोन्याची सुरी झाली म्हणून कांहीं तिला आपल्या पोटांत खुपसून घेणार नाहीं. आपलेच लोक झाले व ते माणुसकीवर घाला घालूं लागले तर त्यांना विरोध करणें प्राप्तच आहे. महाडला अस्पृश्य लोक हेंच प्राप्त कर्तव्य करणार आहेत. त्यांना अस्पृश्येतर समाजांनींसुद्धा सक्रीय मदत देणें अत्यंत जरूरींचे आहे.

या सत्याग्रहासंबंधात श्री. जेधे व जवळकर यांनीं काढलेल्या दुसऱ्या जाहीर पत्रकांत “सत्याग्रह यशस्वी होण्याकरितां कसलाहि ब्राह्मण ह्यांत समाविष्ट करून घेऊ नये' असें एक कलम आहे. तत्व व धोरण या दोन्ही दृष्टींनी हें कलम अनुचित आहे असें आम्हांस वाटतें. श्री. जेधे व जवळकर यांनीं हें कलम कां घातलें असावें हें आम्ही समजतो. आज सामाजिक व धार्मिक क्षेत्रांतील सारे हक्क व अधिकार ब्राह्मणवर्ग दडपून बसला आहे. त्यानें स्वत:ला वर्णगुरूच्या ठायीं स्थापून हिंदु समाजांत बाकीच्या (ब्राह्मणेतर) वर्गाना आपले गुलाम करून ठेवलें आहे. ब्राह्मणांतील कांहीं व्यक्ति स्वातंत्र्यप्रिय असतील, उलटपक्षीं ब्राह्मणेतरांतील कांहीं कुऱ्हाडीचे दांडे भटाळलेले असतील, तथापि तेवढ्यानें