४५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्याच समाजांतील विद्वान वं कर्तबगार धुरिणाला त्याकरितां वाहून घेणें जरूर वाटलें. तेव्हां महाडचा सत्याग्रह सुरू होणार तो कांहीं ब्राह्मणेतर चळवळीचा एक भाग म्हणून सुरू होणार नसून खास अस्पृश्य पुढाऱ्यांनी अस्पृश्य वर्गाकरितांच हातीं घेतलेल्या सत्याग्रहशास्त्राचा पहिला वार या नात्यानें तो सुरू होणार आहे. अस्पृश्यांनीं सत्याग्रहाची कास धरिली ती केवळ ब्राह्मणांविरुद्धच नव्हे, तर ब्राह्मणी धर्माला बळी पडलेल्या ब्राह्मणेतराविरुद्धहि होय. अस्पृश्य आपल्या दृष्टीनें जें वर्गीकरण करतात तें "अस्पृश्य विरुद्ध स्पृश्य” असें आहे. 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' हें वर्गीकरण त्यांच्याही दृष्टीनें स्वयंपूर्ण, अर्थपूर्ण होण्याइतकें ब्राह्मणेतरांनीं अगर ब्राह्मणेतर चळवळीनें अस्पृश्यांना आपल्यांत अद्याप एकजीव करून घेतलें नाहीं. ब्राह्मणेतर चळवळींतच आपलें कल्याण व मोक्ष आहे असें अस्पृश्यांना वाटण्याजोगी परिस्थिती ब्राह्मणेतर चळवळीनें निर्माण केली नाहीं. ब्राह्मणी धर्माचा प्रभावच इतका जबरदस्त आहे कीं, ही परिस्थिति लवकर निर्माण होण्याचे मार्गात फार अडथळे येतील. व्यापक दृष्टीने सामाजिक स्वातंत्र्याकरितां ब्राह्मण वर्गाशी झगडा करून सामाजिक स्वातंत्र्याचा व त्याबरोबरच अस्पृश्योद्धाराचाहि मार्ग ब्राह्मणेतर चळवळ सोपा करीत आहे, यांत शंका नाहीं. पण तो मार्ग पूर्णतः सुकर होईपर्यंत अस्पृश्य समाज वाट पाहू शकत नाही. त्यांचा प्रश्न इतका निकडीचा आहे कीं, ह्याकरितां स्वावलंबनात्मक स्वतंत्र प्रयत्नांचीच आवश्यकता आहे व तो प्रयत्न ब्राह्मण-ब्राह्मणेतर ह्या दोन्ही समाजाविरुद्ध राहणें हें सध्यां तरी अपरिहार्य आहे. तेव्हां जे जे लोक त्यांना त्यांच्या झगड्यांत मदत करतील त्यांना त्यांना ते पांचारण करणार. अमुक जातींच्या माणसांना बोलावू नका असें त्यांना कोणी व काय म्हणून सांगावे ? शिवाय ब्राह्मणांना जर आपल्या कृतकर्माचें प्रायश्चित्त म्हणून महाड सत्याग्रहांत भाग घेऊन स्वतःची शुद्धि करून घ्यावयाची असेल तर त्यांना नको म्हणण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे ?
महाड सत्याग्रह हा ब्राह्मणेतर अगर सत्यशोधक चळवळीपासून स्वतंत्रपणे चालणारा झगडा असला, तरी त्यायोगें ब्राह्मणशाहीचा जातिभेदात्मक शिवाशिवीचा व भेदाभेदाचा किल्ला ढांसळून पाडण्याचे कामीं मदतच होणार आहे. अस्पृश्य पुढाऱ्यांनींहि आपल्या समाजाच्या लढाया लढतांना ही व्यापक दृष्टी ठेविली तर बरें होईल असें वाटतें. अंतिम लक्ष्य स्पष्टपणें समोर असलें तर मार्ग किंवा धोरण चुकण्याचा सहसा संभव वाटत नाहीं. ब्राह्मणी धर्मांच्या नाशाचें अंतिम ध्येय समोर ठेवूनच महाड सत्याग्रह चालविण्यांत यावा असें आमचें मत आहे. निदान ही व्यापक व महत्त्वाची दृष्टी सत्याग्रही पुढाऱ्यांच्या मनांतून अजिबात गैरहजर