महाड येथें सत्याग्रहाला सुरवात होणार - Page 501

महाड येथें सत्याग्रहाला सुरवात होणार ४५५

नसावी एवढी तरी आमची अपेक्षा आहे. निरनिराळ्या सामाजिक अन्यायांविरुद्ध सत्याग्रहाचे झगडे करावे लागणारच ! निरनिराळ्या सत्याग्रहांची फुलें ब्राह्मणीधर्मविनाशाच्या ध्येयाच्या सूत्रांत गुंफून जो एक सुसंबद्ध व सुंदर हार तयार होईल तोच सामाजिक स्वातंत्र्यदेवतेला शेवटीं पूर्णतः प्रसन्न करून घेईल. तेव्हां असल्या सत्याग्रहांत भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांच्या अंगीं कमींतकमी लायकी काय असावी हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ही लायकी ठरविण्यांत यावी व ती ज्याचे ठायीं नसेल त्याला सत्याग्रहांत भाग घेतां येऊं नये. असें केल्यास कोणत्या जातीनें सत्याग्रहांत भाग घ्यावा व कोणत्या जातीनें घेऊं नये ह्या प्रश्‍नांतही महत्व उरणार नाहीं. आमच्या मतें महाड सत्याग्रहांत भाग घेऊं इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनें पुढील अटींना आपली लेखी मान्यता दर्शविली पाहिजे. . (१) जन्मसिद्ध चातुर्वर्ण्यावर माझा विश्वास नाहीं. (२) जातिभेद मला मान्य नाहीं. (३) अस्पृश्यता मीं हिंदु धर्मावरील कलंक समजतों व तो अजिबात नाहींसा करून टाकण्याचा मीं प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. (४) उच्च-नीचतेची भावना मनांत बाळगून हिंदुसमाजापुरतें तरी खाण्यापिण्याचे बाबतींत मी जातिनिर्बंध पाळणार नाहीं. (५) अस्पृश्यांना देवळें, पाणवठे, शाळा, इतर सर्व ठिकाणी स्पृश्यांच्या बरोबरीचे हक्क असावेत असें माझें मत आहे.

ह्या अटी नमुन्यादाखल दिल्या आहेत. त्यांत फेरफार करितां येईल. महाड सत्याग्रहासारख्या सामाजिक झगड्यांत भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांच्या ठिकाणीं कमीतकमी लायकी काय असावी याचें निश्चित माप (measure) ठरविण्यांत यावें एवढाच मुद्दा आहे. चातुर्वर्ण्यावर व जातिभेदावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणारा मनुष्य सत्याग्रहांत भाग घेण्यास तयार झाला तर त्याच्या मदतीचा फायदा अस्पृश्यांनी कां घेऊ नये, असें यावर कोणीही सहज विचारील हें आम्हीं जाणून आहों. पण सत्याग्रह पायाशुद्ध व्हावा व सामाजिक गुलामगिरीच्या मुळाकडे त्याचें दुर्लक्ष होऊं नये, अशी इच्छा असल्यास वरील विचाराच्या माणसाला न घेतलेलेंच बरें ; असें आम्हांस वाटतें. कारण अशा माणसाच्या मदतीला मर्यादा आहेत व त्याहि अत्यंत आकुंचित आहेत. शिवाय त्याच्या मदतीपासून फायद्यापेक्षां अंतीं तोटाच होण्याचा अधिक संभव आहे. हा मुद्दा पुढें मागें आम्ही स्वतंत्रपणे स्पष्ट करूं. तूर्त आम्ही सुचविल्याप्रमाणे सत्याग्रहाकरितां एकादी शपथपत्रिका असावी किंवा काय ह्या प्रश्‍नाचा डॉ.'आंबेडकरांनीं जरूर आस्थेनें विचार करावा एवढें सुचवून हा लेख संपवितों.

बहिष्कृत भारत, ता. २९ जुलै १९२७.