मध्यप्रांत-वप्हाड हिंदु परिषद - Page 518

४७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मुसलमान सांगतील त्या अटी

गांधीपक्ष (उर्फ कांग्रेसपक्ष) बिनतक्रार स्वीकारावयास तयार झाला आहे. सारांश हिंदू-समाजाच्या हितरक्षणाचें काम कांग्रेसवाल्यांकडे सोंपविता येत नाहीं. देशांत शांतता व एकी हवी असेल, तर हिंदुस्थानांत मिश्र मतदार-मंडळे स्थापित झालीं पाहिजेत, असें हिंदूंचे म्हणणें होतें. अलीकडें कांहीं मुसलमान पुढाऱ्यांनी कांहीं अटींवर मिश्र मतदारमंडळें कबूल करून हिंदू मुसलमानांचा सलोखा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनीं घातलेल्या अटींची तपासणी किंवा चर्चा करण्यांत अर्थ नाहीं. कारण मिश्र मतदार मंडळे मुसलमान समाजाला नकोच आहेत | तेव्हां 'स्वराज्यपक्ष' सरते शेवटीं मुसलमानांच्या आग्रहावरून स्वतंत्र मतदार मंडळेच मान्य करील व आणखी कांही वर्षे तरी हिंदूमुसलमानांतील वितुष्ट हल्लींसारखेंच कायम राहील, असा रंग दिसतो. तुम्हांला

हिंदुसभा आणि कांग्रेस

त्यांच्या मनोवृत्तींतील फरक पहावयाचा असेल, तर मुसलमान पुढाऱ्यांनी घातलेल्या एका अटीकडे लक्ष द्या. सिंधप्रांतांत मुसलमानांचे बहुमत आहे म्हणून सिंधप्रांत हा निराळा प्रांत बनवावा, अशी मुसलमान पुढाऱ्यांची मागणी आहे, त्यावर कांग्रेस कमिटीनें काय ठराव पास केला आहे, तो पहा :-

''कांग्रेसनें यापूर्वीच मान्य केलेल्या भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाप्रमाणे प्रांतरचना करण्याची वेळ आतां आली आहे ; व म्हणून जो प्रांत तशी प्रांतरचना करून मागेल त्याची मागणी पूर्ण करण्याच्या कामास ताबडतोब आरंभ केला पाहिजे. आंध्र, सिंध व कर्नाटक यांचे स्वतंत्र प्रांत बनवून या योजनेचा श्रीगणेशा करण्यांत यावा.“ सिंध प्रांतांतील बहुसंख्य लोकसंख्या मुसलमानांची आहे ; आणि म्हणून त्यांनीं सिंध प्रांत स्वतंत्र करावा ही मागणी करणें अगदीं स्वाभाविक आहे. पण कांग्रेसनें भाषावार प्रांतरचनेचें सर्वसामान्य तत्त्व मान्य करण्यास देखील त्यांना भाग न पाडतांच ही त्यांची अट मान्य केली आणि असें करतांना त्यांनीं सिंधच्या हिंदु जनतेच्या मताची देखील दरकार केली नाहीं ही गोष्ट विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे. कोणत्याही एकासमाजाचें बहुमत निर्माण करण्यासाठीं स्वतंत्र प्रांत पाडण्याच्या योजनेचा हिंदु महासभेने निषेध केला आहे आणि मला वाटतें महासभेच्या या निर्णयाबरहुकूम आपण देखील कांग्रेसची योजना बाजूस सारून सिंधच्या असहाय हिंदूंची पाठ राखणेंच अवश्य आहे.