३
सोमवंशीय निराश्रित फंड
या फंडाचा नुकताच बाहेर पडलेला रिपोर्ट आमच्याकडे आला आहे. मुंबई येथे सार्वजनिक कामाचा विचार विनिमय होण्यासाठीं येथील समस्त महार मंडळीस सोईस्कर होईल असें एक मंदिर बांधण्याकरितां सदरहू फंडाची स्थापना ता. १३ नोव्हेंबर १९०९ रोजीं ' सोमवंशीय मित्रसमाजा ' चें विद्यमानें झालीं असें रिपोर्टावरून समजतें. फंडाच्या चालकांनी गर्वोक्तीनें इतर संस्था अशा प्रकारचा अहवाल सादर करीत नाहींत असें म्हटले आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठीं निघालेल्या सर्व संस्थांनी आपले तपशीलवार रिपोर्ट वेळोवेळीं सादर करावे या इषान्यास आमचें अनुमोदन आहे. हा इषारा फार महत्त्वाचा आहे हें निर्विवाद आहे. पैशाचा तपशीलवार हिशेब वेळोवेळीं दाखविल्याखेरीज समाजाला संस्थेच्या कार्याची सत्यता पटणें कठीण आहे. रिपोर्टाच्या अभावी पैशाची मदत करण्यास समाजातील उदार माणसें धजत नाहीं हें सर्व संस्थांनीं ध्यानांत ठेवलें पाहिजे. इतरांना दिलेला हा इषारा सदरहू सोमवंशीय निराश्रित मंदिर फंडाच्या संस्थेने पाळला असतां तर तो त्यांना हितावह झाला असता असें आम्हांस वाटते. फंड स्थापन झाल्यापासून आजतागायत फक्त रु. ११८३-३-७ फंड गोळा झाला आहे. त्यांतल्यात्यांत पाहूं गेलें असतां गेल्या चार asia फंडाची वाढ मुळीच झाली नाहीं. त्यांचें कारण फंड स्थापन झाल्यापासून या संस्थेनें मुळींच रिपोर्ट सादर केला नाहीं असें असावे असा आमचा समज आहे. हया फंडाच्या हेतूसंबंधानें अजून समाजांत एक मत नाहीं. अस्पृश्यवर्गाने उच्चवर्णीय हिंदु लोकांच्या देवळांत जाण्याचा सामाजिक हक्क मिळविण्याचा प्रयत्न करावा किंवा पैसे गोळा करून आपल्या धार्मिक हितासाठी स्वतंत्र देऊळ बांधावे या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल आज आम्हांला देतां येत नाहीं. तेवढ्यावरून फंडाची वाढ करण्याचा प्रयत्न मात्र कमी होऊं देऊ नका. पुढेंमागें जरी फंडाचा हेतु बदलावा लागला तरी फंड असल्यानें कांहीं वावगें नाहीं ; कांहींतरी इष्टच घडवून आणतां येईल. चालकांनी मात्र फंडाच्या कामीं निराश न होतां तो अव्याहत चालू ठेऊन त्याचा तपशीलवार रिपोर्ट देत जाणें हें बरें, अशी आमची त्यांस सूचना