शुद्धीकरणाचें ढोंग - Page 533

परिशिष्ट- ३०
शुद्धीकरणाचें ढोंग

रा. रा. बहिष्कृत भारतकर्ते यास :--

नुकतेंच जुलै महिन्यांत शुद्ध करून घेण्यांत आलेले श्री. सदाशिवराव नायडू पुन्हा ता. ९-१०-२७ रोजीं सॅम्युअल नायडू (खिश्चन) झाले. शुद्धी करून घेण्याचे पूर्वीपासून माझा आणि त्यांचा दाट परिचय होता. हिंदु समाजांत आम्हांस जें स्थान आहे त्याहून उच्च दर्जा ह्या शुद्धीकृतांना मिळूं शकेल. पण त्याहून अधिक अपेक्षा त्यांनी धरूं नये असे मीं त्यांना आरंभींच बजावले होते. तरी पण ते इतरांच्या भुलथापांना फसून जाऊन शुद्ध झाले व पुन्हां निराश होऊन माफी मागत होते तसे खिश्चन झाले. त्यांची अशी आशा होती कीं, त्यांची जात पुन्हां त्यांना आपल्या जातींत मिसळून घेईल. हिंदु धर्माचे शास्त्रीपंडित त्यांना हिंदू धर्माचें ज्ञान करून देतील ; त्यांना हिंदु धर्माची देवळें मोकळीं रहातील व रोटी-बेटी-लोटी व्यवहाराच्या बाबतींत त्याना बरीच मुभा मिळेल. आरंभी ८/४ दिवस तसें घडलेंही, पण शुद्ध झाल्यानंतर हिंदु लोकही त्यांना जवळ : करीनातसे झाले व खिश्चन मित्रांनींही दूर लोटलें. अशा विचित्रावस्थेंत त्यांनीं २/३ महिने घालविले व हल्लीं ते पुन्हां खिश्चन झाल्यामुळे ते आनंदांत आहेत.

ह्याप्रमाणें सोवळ्या हिंदु सभेच्या शुद्धीकरणाचें ढोंग उघड झालें. जोंपर्यंत ७ कोट अस्सल हिंदूंना अस्पृश्य मानून त्यांच्याशीं कोणताच व्यवहार करण्यांत येत नाही. व स्पृश्य हिंदूंतही अनेक जातीं असून त्यांचेंमध्यें रोटी-बेटी-लोटी बंदी असल्यामुळें खुल्या दिलाने व्यवहार होत नाहीं तोंपर्यंत बाटग्या शुद्धीकृत लोकांची अशीच गत व्हावयाची. आधीं संघटण व मग शुद्धी असेंच घडलें पाहिजे. दोन्ही एकाच वेळीं चालू शकणार नाहींत. हिंदु समाजांत प्रथम खिश्चन, मुसलमान समाजाप्रमाणें समता उत्पन्न झाली पाहिजे. जोपर्यंत समता उत्पन्न झाली नाहीं तोंपर्यंत तबलीघ व मिशनरी चळवळीस तोंड देऊ पहाणें मूर्खपणाचे होय. श्री. नायडूंच्या वरील उदाहरणावरून शुद्धी चळवळवाले प्रथम अस्पृश्यतानिवारण, जातिभेदविध्वंसन वगैरे उपायांनी संघटण करण्याचे मार्गास लागतील काय ? जोंपर्यत ते तसें करणार नाहींत तोंपर्यंत त्यांच्या शुद्धी चळवळीचे हंसें झाल्यांशिवाय