शुद्धीकरणाचें ढोंग - Page 534

४८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

राहणार नाहीं व नाहक मिशनरी तबलीघ व त्यांची स्पर्धा मात्र वाढेल. पण हा सुविचार लक्षांत येण्यास स्वतःच्या उच्चपणाची घमेंडच आड येते त्याला करावें काय !

आपला,

पांडुरंग नाथुजी राजभोज,

२११, घोरपडे पेठ, पुणें.

शुद्धिसमारंभ व ब्राह्मणेतरांचे कर्तव्य

रा. रा. बहिष्कृत संपादक यांस स. न. वि. वि. कृपा करून चार शब्द लिहिण्यास आपल्या पत्रांत जागा मिळेल अशी विनंति आहे.

नागपूर महाराजबाग जवळील धरमपेठ येथें बुधवार तारीख १९-१०-२७ रोजीं सकाळीं ८ वाजतां मारुतीच्या देवळांत येथील शेतकी कॉलेजांतील एक डिमॉनस्ट्रेटर, श्रीयुत एन. के. विश्वास यांना परत हिंदु धर्मात शुद्ध करून घेण्यांत आलें. त्यावेळीं अस्पृश्यता निवारणासंबंधानें डॉ. मुंजे यांचें भाषण झालें. मि. विश्वास हे हिंदी खिस्ती होते, व त्यापूर्वी ते महार जातींतील होते. हिंदु धर्मांत परत आल्यावर ते पुन्हां महारच जातीचे झाले. अर्थात त्यांना व इतर महारांना देवळांत येण्याची आतां मोकळीक आहे कीं नाही ? असा डॉ. मुंजे यांना कांहीं महार मंडळीनीं सभेंत प्रश्‍न विचारला. व डॉ. मुंजे यांनी हरकत नाहीं असें सांगितलें. त्यानंतर तीन चार महार मंडळी नारळ घेऊन तेथील एका देवालयांत गेली व त्यांना कोणी हरकत घेतली नाहीं. त्यांनी देवांपुढें नारळ ठेवून नमस्कार केला . . . . दुसऱ्या दिवशीं सकाळी आणखी कांहीं महार मंडळी पूजेचें साहित्य व काकड आरतीची दिंडी घेऊन त्याच देवळांत जाऊ लागली, तेव्हां ब्राह्मणेतरांनी त्यांना प्रतिबंध केला, व एका महाराच्या हातांतील पूजेचें साहित्यहि विसकटून टाकण्यांत आलें. तंटा वाढण्याचा रंग दिसू लागतांच पोलिसांना खबर मिळाल्यामुळे पोलीस अधिकारी, पोलीस तुकडीसह त्या ठिकाणीं गेले, व त्यांनीं शांतताभंग न होऊ देण्याची तजवीज केली.

पोलीस बंदोबस्त वेळेवर झाला नसता तर महार आणि ब्राह्मणेतर यांच्यांत मारामारी होऊन एकमेकांचीं डोकीं फुटेपर्यंत पाळी आली असती, असें म्हणण्यास हरकत नाही. अस्पृश्य गणलेल्या वर्गात महार समाज हा जास्त जागृत झालेला व होत चाललेला आहे. व त्यांना पुरातन रूढीच्या स्थितींत दाबून ठेवणें, सध्या