परिशिष्ट-३१
अस्पृश्य स्वच्छतेने राहतात हाच त्यांचा अपराध
अस्पृश्यलोक परधर्म स्वीकारणार
रा. रा. दत्तात्रय रामचंद्र रारावीकर, अकोला यांस बि. बि. आठवले, अस्पृश्य समासेवक दहिदांडा यांजकडून विनंति मी कीं, मागे लासूर, ता. दर्यापूर येथील महार लोकांचा अर्ज ख्रिस्ती होणार आहेत म्हणून पाठविला होता. त्याची चौकशी अद्याप झाली नाहीं. लासूर येथील स्पृश्य हिंदूंनीं महारांस तकलीब देण्याचा ठराव केला म्हणून पुन्हा लासूरकर महार लोकांनी मला लिहिलें आहे. आमचे लोक शुद्धतेनें राहतात म्हणून स्पृश्य हिंदू असा जुलूम करितात. पण ते जर खिस्ती बनले तर सर्व चाळे बंद पडतात. आपण आमच्या समाजाचे हितार्थ झटतां म्हणून आपणाकडे मी विनंती करितों कीं, लासूर मुक्कामी होत असलेला अत्याचार दूर होण्याबद्दल व्यवस्था करा. लवकर. व्यवस्था न झाल्यास व त्या लोकांनी जर परधर्म स्वीकारला तर माझेकडे कोणत्याही प्रकारें बोल राहणार नाहीं. माझेवर सुद्धां अशा प्रकारें अडचणी आल्या होत्या त्या मीं सहन केल्या. पोळ्याचे दिवशी पोलीस सब-इन्स्पेक्टरनें धोक्यानें मला कोंडून मारलें व अस्पृश्य जनतेचे सुधारणेंत आडकाठी आणली. दहिदांडा मुक्कामी होत असलेल्या अस्पृश्य चळवळीस ही मोठी जबर जखम झाली आहे. मी प्रजापक्षाचे ता. २१-८-२७ चे अंकांत 'दाद लागेल काय' या मथळ्याखाली लेख दिला म्हणून मला धोक्यानें स्टेशनमध्ये बोलावून मारलें. तेव्हां मी संपादक प्रजापक्ष यांचेकडे मोगलाई कीं आंग्लाई या सदराखालीं लेख प्रसिद्धीला पाठविला तो अद्याप प्रसिद्ध झाला नाहीं. काय गोम आहे हें समजत नाहीं. आपण मुंबईस जाणार आहांत असें समजल्यावरून आमचे खंबीर पुढारी रा. रा. डॉक्टर आंबेडकर यांना ही हकीकत कळवावी व सविस्तर माझे संबंधी हकीकत सांगून बहिष्कृत भारत नांवाचे पत्राचा मला वर्गणीदार बनविण्यास सूचना द्यावी. डाक्टर साहेब सर्व व्यवस्था करतील अशी आशा जाणून आपले मार्फत विनंती केली आहे. आपलें लक्ष आमचे समाजाची उन्नति करण्याकडे असून आमचेबद्दल आपण निर्भिडपणे कामगिरी करितां हा आमचे अस्पृश्य समाजावर आपला मोठा उपकार आहे. अशा प्रकारें काम करणारे निर्भिड महात्मे आमचे हिंदु धर्मात निपजोत अशी परमेशवराजवळ विनंती आहे. कळावें, ता. २२-९-२७.
आपला,
बळिराम भिवसन आठवले,
महार समाजसेवक हिंदु दहिदांडा.