अस्पृश्य स्वच्छतेने राहतात हाच त्यांचा अपराध ४९१
आम्हांस मुसलमानी धर्मात घ्या
मे. अजमत मिया जहागीरदार साहेब बाळापूर यांजकडेस, विनंति कीं, --आपण मुसलमानी धर्मांचे खरे जाणीक आहां असें पूर्ण समजल्यामुळे, मी एक बेधर्मी विनंति करतों की, मी हिंदु हिंदू म्हणून आजपर्यंत ओरड करीत होतें हें सर्व चूक आहे. असा अनुभवं आला. हिंदु धर्मांत उच्चनीचपणाची मूर्ख चाल नांदित आहे ; त्यामुळे मला माझा धर्म कोणता हे कळलें नाहीं. हिंदू म्हणावें तर जनावरापेक्षां नीच मानितात त्यामुळें हिंदुधर्म गलिच्छ दिसतो. ज्या धर्मात समतोलत्व नांदतें. तो धर्म मोठाच आहे अशी मागील इतिहास साक्ष देतो. पहिल्यापासून मुसलमानी धर्माचें संशोधन केलें तर असें दिसून येतें कीं, आमचा अस्पृश्य समाज खरोखर मुसलमानी धर्माचा वंशज आहे. परंतु हिंदु लोकांतील काफर पुरुषांनीं अस्पृश्यांस भुलथाप देऊन आपल्या हिंदु धर्मात ओढून, त्यांना निर्बुद्ध केलें आहे. एवढें मोठें घोर पाप हिंदु धर्म करीत आहे. आजकाल मुसलमानी धर्मातून जे लोक हिंदुधर्म स्विकारीत आहेत ते खरोखर पापी आहेत. मुसलमानी धर्मांत समाज जागृती कमी आहे, म्हणूनच हिंदूधर्मांत भर पडत चालली आहे. आपण जर अशा आणीबाणीच्या वेळेस जाहीर रितींने एखाद्या अस्पृश्य मानलेल्या हिंदुस मुसलमानी धर्माची माहिती दिली नाहीं, तर अस्पृश्य हिंदूचे अस्पृश्यत्व दूर होणार नाहीं. तरी मला आपल्या धर्मांची तत्वें समाजावून देण्याकरितां आपले अध्यक्षतेखाली सभा भरवून मुसलमान बनविल्यास मी परमेश्वराजवळ आपले गूण सदोदीत गाईन ; व अशा प्रकारें आमचा अस्पृश्य मानलेला समाज मुसलमानी धर्मांत आणण्याचा प्रयत्न करीन. तरी या संबंधी आपलें मत व्यक्त करण्याबद्दल माझी विनंती आहे. कळावें हे विनंति ता. ४-८-१९२७.
आपला,
सूर्यभान भिवसन महार,
दहिहांडा.. ता. अकोट* |
सं. ब. भा--वरील दोन्ही पत्रें आमच्याकडे रा. रारावीकर यांच्यात प्रसीद्धिकरितां आली आहेत.
*जिल्हा अकोला (महाराष्ट्र)
बहिष्कृत भारत : ता. ४ नोव्हेंबर १९२७.