राजर्षी छत्रपती शाहू - Page 539

परिशिष्ट-३३
राजर्षी छत्रपती शाहू

अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांची चळवळ विस्तृत करण्यासाठी ज्या वरिष्ठवर्गीय लोकांनी मनापासून प्रयत्न केले, त्यात कोल्हापूरचे राजर्षी श्रीछत्रपती शाहू महाराज हे अग्रगण्य होते. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रातील अस्पृश्यांच्या चळवळीस व्यापक व चिरायु स्वरूप जर कोणी दिले असेल, तर ते राजर्षींनी होय. राजर्षीचा जन्म ता. २६ जुलै १८७४ ला झाला. कोल्हापूर संस्थांनच्या महाराणी आनंदीबाईसाहेब यांनी १७ मार्च १८८४ ला त्यांना दत्तक घेतले. ता. २ एप्रिल १८९४ ला ते गादीवर स्थानापन्न झाले. तेव्हा त्यांना आश्चर्याने थक्क करणारे व दु:खाने व्याकूळ करणारे असे जर कोणते दृश्य दिसले असेल तर ते म्हणजे संस्थानाच्या व स्थानिक स्वराज्याच्या खात्यांचा ब्राह्मण जातींच्या लोकांच्या हातून अनियंत्रितपणे चाललेला कारभार. ब्राह्मणेतर जातींतील लोक बोटांवर मोजण्याइतकेच होते. याचे कारण काय व ते कारण कसे दूर करावे याबद्दलचे विचार छत्रपतींच्या डोक्यांत एकसारखे घोळू लागले. ब्राह्मण जातीत शिक्षणप्रसार बराच झालेला होता. शिवाय पेशव्यांच्या कारकीर्दीपासून राज्यकारभाराच्या खात्यात ब्राह्मणांचे अढळ स्थान परंपरेने कायम होऊन बसलेले होते. ब्राह्मणेंतर वर्गामध्ये शिक्षणप्रसार झालेला नव्हता व राज्यकारभाराच्या खात्यांमध्ये त्यांचा प्रवेश झालेला नव्हता. जो काय प्रवेश झालेला होता तो शिपाई, भालदार, चोपदार म्हणून. विचारांती छत्रपतींनी मनात असे ठाम ठरविले की, ब्राह्मणेतरांच्या हातात अधिकारसूत्रे आणून द्यावयाची तर त्यासाठी त्यांच्यात शिक्षणप्रसार जारी करून सुशिक्षित लोक तयार करावयाचे व त्यांना अधिकाराच्या व इतर पदांवर नेमावयाचे व त्यासाठी बहुजन समाजात जागृतीची जोरदार चळवळ चालवावयाची. त्याप्रमाणे छत्रपतींनी संस्थानात दौरे काढून शिक्षण- प्रसाराची व लोकजागृतीची चळवळ धुमधडाक्याने चालू केली.

ब्राह्मणेतर जातीतील हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देणे व ठिकठिकाणी वसतिगृहे चालू करून ती स्वतःच्या द्रव्यसाहाय्याने चालविणे हे भरीव कार्य छत्रपतींनी हाती घेतले. महार, मांग, ढोर, चांभार, मराठे, शिंपी, न्हावी, मुसलमान इत्यादी जातींतील मुले शिकून तयार झाल्यानंतर त्यांना संस्थानच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये छत्रपतींने नेमले. काहींना वकिलांच्या सनदा दिल्या. याकरिता त्यांनी १९०२ पासून संस्थानातील अर्ध्या जागा मागासलेल्या