४९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
जातीकरिता राखून ठेवल्या. यामुळे नोकऱ्यांची मिरासदारी भोगत असलेल्या ब्राह्मणांना संस्थानांत नोकऱ्या मिळणे अशक्य झाले. शिवाय ब्राह्मणेतर समाजात स्वहक्काची जाणीव झाल्यामुळे दररोजच्या व्यवहारात आतापर्यंत असलेला ब्राह्मणांचा वरचष्मा कमी होऊ लागला. परिणामी ब्राह्मण छत्रपतींना शत्रू समजू लागले.
१९०० सालच्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी महाराज सहपरिवार सुर्योदयापूर्वी पंचगंगेच्या स्थानास गेले, तेव्हा त्यांचा राजोपाध्ये उशिरा आला. महाराजांनी त्याला प्रथम स्नान करण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला, “ मला थंडीमुळे पाणी गार लागते, शिवाय मला पुराणोक्त मंत्र म्हणावयाचे आहेत, तेव्हा मला शुचिर्भूत होण्याचे कारण नाही. “ यावर महाराज संतापले व त्याला म्हणाले, “ आम्ही स्नान करण्याच्या अगोदर तू स्नान करून तयार राहून आमच्या स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र इतकी वर्षे म्हणत असे आणि आताच तुला हे काय वेड लागले ? “ यावर ब्राह्मण म्हणाला, “ महाराज, तुम्ही राजे असला तरी, शूद्र आहात व तुम्हाला वेदोक्त मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही. तुम्ही फक्त पुराणोक्त मंत्र ऐकावेत व ते मी शुचिर्भूत न होता म्हणालो तरी त्याला शास्त्राची आडकाठी नाही. “ राजोपाध्ये याची ही गर्विष्ठ चर्पटपंजरी ऐकून महाराज संतापाने थरथर कापू लागले. त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून आर्य धर्माचा स्वीकार केला.
वरील उदाहरण व इतर उदाहरणे लक्षात घेऊन वैदिक काळापासून आतापर्यंत ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना धार्मिक बंधनांनी कसे जखडून टाकले व ती बंधने दूर करणे कसे आवश्यक आहे, याची महाराजांना पुरेपुर जाणीव पटली. याकरिता त्यांनी ' ११ जानेवारी १९११ रोजी ' महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे पुनरूज्जीवन केले. याच चळवळीतून पुढे सत्यशोधक तमासे निघाले. या विविध चळवळींना महाराज सढळ हातांनी द्रव्य देत असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचा १९१७ साली परिचय झाला. “त्यांनी डॉ. आंबेडकरांना ' मूकनायक ' पाक्षिक चालविण्याकरिता अडीच हजाराचा चेक दिला आणि हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० पासून सुरू केले. "7
डॉ. आंबेडकर करीत असलेल्या समाजोन्नतीच्या कार्याबद्दल माणगाव येथील २१/२२मार्च १९२० च्या परिषदेत आपल्या भावना व्यक्त करताना शाहू महाराज म्हणतात, “ माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी
१: खैरमोडे, खंड-१, पृ. २२९-३३३.