स्वराज्याची सर सुराज्याला नाही ! - Page 54

स्वराज्याची सर सुराज्याला नाही !
आजवर ज्ञात असलेल्या भूगोलाकडे राजकीय दृष्टीने पाहिलें असतां त्यांतील

देशांचे आपणाला एक स्वयंशासित व दुसरा परशासित असे दोन मुख्य वर्ग करितां येतात. स्वयंशासित देशांतील कारभार त्या देशांत राहणाऱ्या लोकांकडेच असतो. पण परशासित देशाची स्थिति तशी नसते. त्यांचा राज्यकारभार परदेशांतील लोकांच्या हातीं असतो. अशा या वर्गीकरणांत हिंदुस्थान देशाचा अंतर्भाव दुसऱ्या वर्गात होतो. या देशांत रहाणारे हिंदु, मुसलमान, पारशी वगैरे लोक जरी आहेत तरी त्यांना हिंदी लोक या सर्वसाधारण नावाने संबोधितां येईल ; पण या हिंदी लोकांवर राजकीय अंमल चालविणारे लोक मात्र हिंदी नाहींत म्हणजे हिंदी लोक स्वयंशासित नाहींत. आज बरेच दिवसांपासून हिंदुस्थान हा देश परकीय अमलाखाली आहे. हा सुपीक देश काबीज करून घेण्यास बऱ्याच जुन्या पाश्चात्य राष्ट्रांनी अनेकवार प्रयत्न केले. रोमन व ग्रीक लोकांनींहि या दिशेनें प्रयत्न केला. तो विफल झाला, पण मुसलमान लोकांनी केलेल्या प्रयत्नांस जबर फळ आलें. जरी मुसलमान लोकांच्या हिंदुस्थानावरील स्वाऱ्यांस इ. स. ९८६ त सुरुवात झाली तरी त्यांना या देशांत कायमचे ठाणें मिळण्यास बराच अवधि लागला, पृथ्वीराज जेव्हां ११९३ मध्यें लढाईत मरण पावला तेव्हां हिंदु बादशाहीचें दिल्लीचे तकत कायमचे मोकळें पडलें. ज्या पठाण लोकांनीं ही गादी बळकाविली त्यांचा १५२६ मध्यें पानिपत येथें मोगल लोकांचा अधिपति बाबर यानें पराभव करून दिल्ली येथें हिंदुस्थानचा बादशाहा अशी आपल्या नावानें द्वाही फिरविली. पण स्थापन होऊन दोनशें वर्षाच्या आतच दिल्लीचे हिंदुतक्त जिंकलेल्या या मुसलमानी सार्वभौम सत्तेला उतरती कळा लागली. कांहीं काळ ती सत्ता दक्षिणेंतील मराठे लोकांकडे होती, पण शेवटी ती कायमची इंग्रजांच्या हातीं गेली, व तेथें ती दैविक योजनेने आजतागायत अबाधित आहे. अशी या देशाच्या पारतंत्र्याची पूर्वपीठिका आहे.

राज्यकारणाचे सर्वसाधारण असे दोन आद्य हेतु आहेत. एक शासन व दुसरा संस्कृति. शासन म्हणजे शिस्त अगर शांतता ठेवणें. शांततेचा भंग दोन तर्‍हेनें होऊ शकतो. परचक्रामुळे किंवा अंतस्थ अस्वस्थतेमुळे. परचक्राची बाब-आणि ती क्वचित उदूभवते-बाजूस ठेवली तर शासनांत अंतस्थ व्यवस्था ठेवणें हाच