परिशिष्ट- ३५
.... अशा वेळी ब्राह्मणेतरांनी विरोध करावा शरमेची गोष्ट
ब्राह्मण जोडणेशाहीच्या एकतर्फी निवडणूकीच्या दुराग्रहामुळें सभेत
विरोध उत्पन्न होऊन सभा उधळली.
रा. रा. बहिष्कृत भारत कर्ते यांस :--
तारीख १७ नोव्हेंबर १९२७ रोजीं सायंकाळी ५ वाजतां येथील श्री. वीरेश्वराचे देवालयांत अखिल नागरीकांची सभा भरविण्याविषयीं सकाळी गुरवाकडून सर्वांना कळविण्यांत आलें होतें. ता. २६-१२-२७ रोजीं अस्पृश्य लोक येथील चवदार तळ्यावर जो सत्याग्रह करणार आहेत, त्याबद्दल विचार करावयाचा होता. सभेत सुमारें ७००।८०० लोक हजर होते. रा. रा. वामनराव जोशी वकील यांनी आरंभी सभा भरविण्याचा उद्देश सांगितला. तो असा की, अस्पृश्य लोक जो सत्याग्रह करणार आहेत त्या सत्याग्रहाला विरोध करण्याकरितां सर्व नागरिकांनी ठराव पास करावा. व सभेचें अध्यक्षस्थान रा. रा. बाळं भटजी यांनी स्वीकारावें असें सुचविलें सभा भरविण्याचा उद्देश जाहीर केल्यावर सभेंत मतभेद झाला; व रा. रा. चुनीलाल मेहता यांनी सभेचा उद्देश केवळ असाच होता असें कळविण्यांत आलें नव्हतें, सत्याग्रहाबद्दल नुसता विचार करावयाचा आहे असेंच कळविलें होतें, असें सांगून रा. बाळं भटजी यांच्या अध्यक्षतेस विरोध केला. व याला रा. बापुराव जोशी यांनीं पाठिंबा दिला. रा. वामनराव जोशी यांच्या सूचनेस अनुमोदन न मिळतांच रा. वासुदेव ओक उठले; व त्यांनी विसंगत, हास्यास्पद व आतापर्यंत सभेच्या कोणत्याही नियमाला न धरून अशी उपसूचना केली कीं, सूचविलेल्या अध्यक्षांना कायदेशीरपणें काम करतां यावयाचें नाहीं म्हणून एक दुय्यम अध्यक्ष निवडावा व तें काम करण्याबद्दल रा. रा बंडोपंत जोशी (वकील) यांचे नांव सुचविलें. या त्यांच्या उपसुचनेमुळें तर सभेंत हंशा व गोंगाट उद्भवला; व उपसूचना करणारांची सभेंत टर उडाली. आश्चर्याची गोष्ट ही कीं, ही सूचना करणारे गृहस्थ येथील ब्राह्मणवर्गापैकीं, ज्यांना सभेचे नियम व शिस्त माहिती, व शाळेंत मास्तरांचे काम केलेले आहेत अशा वरिष्ठ ज्ञातीतील माणसांनेंच सभेंत शिस्त मोडली तेव्हां त्यांच्या अकलेची तारीफ काय करावी ? या त्यांच्या उपसूचनेस रा. रा. सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस यांनीं, व रा. रा. बापुराव जोशी यांनी हरकत घेतली. अध्यक्षस्थान श्री. पितांबर भाई गुजर यांनी स्वीकारावे असें