परिशिष्ट-३६
जोतीराव फुले
पेशवाईचा अंत १८१८ साली झाल्यानंतर अवघ्या ९ वर्षांनंतर जोतीरावांचा जन्म चैत्र शु. ॥, शके १७४९ बुधवार ता. ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. राजा राममोहन राय, बाळशास्त्री जांभेकर आदी ब्राह्मण मंडळी जितके इंग्रजी शिकले तितकेच शिक्षण जोतीरावांचे झाले होते आणि इंग्रजी शिक्षणाची जी शेवटची परीक्षा होती त्या परीक्षेत जोतीराव पहिल्या नंबरने पास झाले. त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू. कानडी, मद्रासी व गुजराथी अशा सहा भाषा येत होत्या, शिक्षण संपल्यानंतर त्यांनी समाजाची स्थिती माहीती करून अभ्यास करण्यासाठी मुंबई, नागपूर, कोल्हापूर या भागातील कित्येक खेड्यात फिरून कित्येक लोकांची
ओळख करून घेतली.
शूद्रादिअतिशूद्रांचा अधःपात हा शिक्षणाच्या अभावी झाला याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी, स्वतःच्या पत्नीला, सावित्रीबाईला शिकविले आणि त्यांना शिक्षिकेचा दर्जा प्राप्त करून दिला. १८४८ साली, मुलींसाठी आणि महार-मांग वगैरे अतिशूद्रांसाठी शाळा काढल्या. १ नोव्हेंबर १८५८ रोजी अनाथ बालबालिकाश्रम स्थापन केले. १८६३ साली आपल्या वाड्यात विधवांच्या गुप्त बाळंतपणाची सोय केली. २५ सप्टेंबर १८७३ रोजी शूद्रादिशूद्रांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८७७ साली भालेकरांच्या साह्याने 'दीनबंधु' पत्र सुरू केले. १८८२ साली हंटर कमिशनपुढे साक्ष देताना सरकारने शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे करावे आणि शूद्रादिअतिशूद्रास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या द्याव्यात अशी सर्वात प्रथम आरक्षणाची मागणी केली. १८८५ साली हिंदू धर्माचा पुतळा करून काँग्रेसच्या अधिवेशनासमोर महार समाजाकडून जाळला. १८८७ साली अस्पृश्य समाजातील कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी त्यांना सभेत कसे बोलावे हे शिकविले होते व त्यांना सभेत बोलायला लावीत. त्यांनी अंगिकारल्या जिवित कार्याची (मिशन) पावती म्हणून ११ मे १८८८ रोजी त्यांचा मुंबई कोळीवाड्यात आयोजित जंगी सभेत सत्कार करण्यात आला व त्यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली. १८९० साली न्हावी लोकांची संघटना करून 1वेधवांचे केशवपन करायचे नाही अशी घोषणा केली.