५०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
श्रीधर बळवंत टिळक
(लेखक-दिनकर शंकर जवळकर)
गेल्या गणपती उत्सवात जेव्हा केसरी कपूचा बखेडा विशेष स्वरूपाचा झाला, गायकवाड वाड्यातील गणपतीपुढे अस्पृश्यांचा मेळा नेण्याचे जेव्हा टिळक बंधूंनी ठरविले त्या वेळचा प्रसंग अजून आमच्या दृष्टीसमोर दिसत आहे. श्रीधरपंतांनी अस्पृश्य मेळा नेण्याचा निर्धार केला होता. एक दिवस दुपारी आम्हाकडे जेध्यांच्याकडून सारखी बोलावण्यावर बोलावणी येऊ लागली ; आम्हाला कारण काहीच कळेना. जेधे यांचेकडे जाऊन पाहतो तो तेथे आमची वाट पहात श्रीधरपंत बसलेले! 'जेधे मॅन्शनमध्ये जवळकरांची वाट पहात टिळकांचा मुलगा बसला आहे' असे वाक्य त्यापूर्वी जर कोणी उच्चारले असते तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. परंतु यावेळी श्रीधंरपंत-टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत-ब्राह्मणेतर तत्त्वावर, सत्यशोधक चळवळीवर प्रेम करणारे बनले होते. अस्पृश्य मेळा वाड्यात नेण्यांचा त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला त्याचवेळी जेध्यांच्या मारुतीच्या देवळातहि तोच मेळा आम्ही आत घेऊ असे श्री. जेधे यांनी कबूल केले. या वेळेपासूनच श्रीधरपतांच्या खऱ्या सार्वजनिक आयुष्याची सुरवात आहे. यानंतर त्यांनी अत्यंत धैर्याने अस्पृश्योद्धाराच्या चळवळीकडे आपले लक्ष घातले. समाज-समता-संघाची पुण्यात स्थापना करून आपल्या वाड्यात सहभोजन घडवून आणले. याला अजून पुरा महिनाहि लोटला नाही. श्रीधरपंतांचे कार्य यावेळी ऐन भराला आले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर श्रीधरपंतांच्या हालचालीकडे लक्ष लावून बसला होता. समाज-समता-संघाच्या सहभोजनाने भिक्षुकशाहीच्या भयंकर रोषास श्रीधरपंत पात्र झाले असतील, पण याच सहभोजनामुळे कोट्यावधी ब्राह्मणेतरांच्या प्रेमास पात्र झाले होते. . . . . * (पा. ५)
रामभाऊंची मुलाखत
“प. वा. श्रीधरपंत उर्फ बापूसाहेब टिळक यांच्या हृदयद्रावक व शोकजनक निधनानंतर त्यांच्या आत्महत्त्येच्या कारणासंबंधाने पुणे शहरात ज्या काही नाना तऱ्हेच्या बाजारगप्पा प्रसृत झाल्या आहेत त्यासंबंधात नक्की माहिती मिळण्याकरिता काल ता. २८ रोजी ज्ञानप्रकाशाच्या खास प्रतिनिधींनी प. वा. श्रीधरपंतांचे वडील बंधू श्री. रामभाऊ टिळक यांची मुलाखत घेतली. तेव्हा रा. रामभाऊ म्हणाले “पुण्यामुंबईतील काही प्रतिष्ठित पण खोडसाळ वृत्तपत्रकारांनी माझ्या बंधूच्या आत्महत्त्येसंबंधात ज्या काही बेजबाबदार हकीकती प्रसिद्ध केल्या आहेत त्याबद्दल