श्रीधर टिळकांची आत्महत्त्या ? - Page 555

श्रीधर टिळकांची आत्महत्त्या ? ५०९

मला आश्चर्य वाटते. त्याचा तीव्र निषेध व इन्कार करणे हे माझे कर्तव्य आहे. समाजसमतासंघ स्थापन केल्याचा पश्‍चात्ताप झाल्यावरून श्रीधरपंतांनी आत्महत्त्या केली असे म्हणणे हे निव्वळ मूर्खपणाचे आहे. तो संघ स्थापन केल्याबद्दल त्यांना कधीही पश्चाताप वाटला नाही. उलटपक्षी, तो स्थापन झाल्या दिवसापासून त्यांना एक प्रकारचे समाधान वाटत होते. इतकेच नव्हे तर, सातारा, नगर, नाशिक वगैरे ठिकाणी त्या संघाच्या शाखा स्थापन करण्याचे खटपटीत ते होते. हा त्यांचा निर्धार त्यांनी माझेजवळ व रा. पां. ना. राजभोज वगैरे मित्रमंडळीजवळ कित्येक वेळा बोलूनही दाखविला होता. अशा स्थितीत त्यांच्या आत्महत्त्येचा संबंध समाज-समता संघाच्या स्थापनेशी लावणे यासारखा अप्रयोजकपणा दुसरा कोणताच नाही, असे म्हटले तरी चालेल. .. . . * (पा. ५)

श्री. श्रीधरपंत टिळकांचा हृदयद्रावक मृत्यू

समाज समता संघातर्फे दुखवट्याची सभा

कै. श्रीधरपंत बळवंत टिळक यांच्या अकाली अपघातजन्य मृत्यूमुळे दादर येथील समाज समता संघाने परळ येथील दामोदर हॉलमध्ये रविवार ता. २७-५-१९२८ रोजी रात्री ९ वाजता एक जाहीर दुखवट्याची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविली होती. सभागृह निरनिराळ्या पंथांच्या, जातींच्या आणि पक्षांच्या लोकांनी भरून गेले होते. आणि जिकडे तिकडे एक प्रकारची भीषण गंभीरता दिसत होती. प्रत्येकाचे मन श्रीधरपंताच्या आत्महत्येमुळे हळहळत होते. "महाराष्ट्राचा एक तेजस्वी कार्यकर्ता तरूण समाजक्रांतिवीर मृत्यूमुखी पडला !' असा ध्वनि सर्व बाजूने उमटलेला स्पष्ट दिसत होता. सभेस श्री. केशवराव ठाकरे, वरेरकर, पी. आर. लेले, श्री. देवराव नाईक, श्री. सीतारामपंत बोले, श्री. जोगळेकर, आचार्य फासे, मे. प्रधानबंधू श्री. कवळी, खांडके, कद्रेकर, जाधव, श्री. उत्तमराव कदम, गोपीनाथ प्रधान, सौ. मनोरमाबाई प्रधान वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती. त्यातल्या त्यात अस्पृश्य वर्गाचा जमाव विशेष होता.

डॉ. आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारल्यावर आपले प्रास्ताविक भाषण सुरु केले. ते म्हणाले-'कै. श्रीधरपंतांचा व माझा संबंध सख्ख्या भावापेक्षा अधिक जिव्हाळ्याचा होता. समाज समता संघाशी त्यांचा संबंध जुळून आल्यापासून त्यांच्याविषयी मला विशेष आपलेपणा वाटत असे. त्यांनी सामाजिक सुधारणेच्या कार्याला गति देण्याची जी धडाडी दाखविली तिची किंमत मला अधिक श्रेष्ठ प्रतीची वाटू लागली होती. जुने लोक, जुनी परंपरा आज बाजूला ठेवून आणि दूरवर