परिशिष्ट-४१
पं. जवाहरलाल मोतीलाल नेहरू
पं. जवाहरलाल मोतीलाल नेहरू, (१४ नोव्हेंबर १८८९-२७ मे १९६४) - भारतातील स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला. जवाहरलालांचे प्राथमिक शिक्षण घरीच उत्तम शिक्षकांकडून पार पडले. त्यामुळे जवाहरलाल यांच्या कोवळ्या मनावर काही काळ थिआऑसॉफीचा प्रभाव होता. त्यांचे मन प्राचीन धर्मग्रंथांकडे आकृष्ट झाले. त्यांनी उपनिषदे, भगवद्गीता, महाभारत, रामायण यांचे वाचन केले. पंडितजींचे एकूण बालपण काहीशा संमिश्र सांस्कृतिक वातावरणात पार पडले; घरातील पश्चिमी वळणाची राहणी, आई व मावशी यांचे पारंपरिक संस्कार, उत्तर भारतीय उच्च वर्गात टिकून राहिलेल्या खानदानी, मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आणि वडिलांकडून लाभलेला अनिष्ट सामाजिक रूढींबद्दलचा बंडखोरपणा इ. कारणांनी व आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाने पंडितजींचे मन कोणत्याही एकान्तिक विचारधारेपासून अलिप्त राहिले व त्यास एक उदार सहिष्णू वळण लागले.
जवाहरलाल पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले (१९०५). इंग्लंडमधील हॅरो या प्रसिद्ध विद्यालयात दोन वर्षे शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ट्रिनिटी महाविद्यालयात (केम्ब्रिज विद्यापीठ) ते दाखल झाले (१९०७). यावेळी भारतात बंग-भंग चळवळ जोरात होती. परदेशी मालावरील बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार व सशस्त्र क्रांती हा केंब्रिज विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांचा एक चर्चेचा विषय होता. त्यावेळचे सारे विद्यार्थी लो. टिळक पक्षाचे म्हणजे जहाल राष्ट्रवादी होते. पंडितजीही त्याला अपवाद नव्हते. या सुमारास त्यांनी श्यामजी कृष्णवर्मा, गोपाल कृष्ण गोखले, बिपिनचंद्र पाल इ. राष्ट्रीय नेत्यांची भाषणे ऐकली. १९०५ च्या रूसो-जपानी युद्धाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. भूशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र हे तीन विषय घेऊन ते दुसऱ्या वर्गात पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा दिली. त्यांच्या मनावर इंग्लंडमधील उदारमतवादाचाही खोल ठसा उमटला. फेबियन समाजवादी चळवळीकडे आणि इतर समाजवादी विचारांकडे ते आकृष्ट झाले.