डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५३०
मात्र असें ठरविण्यांत येत आहे, कीं अशा रीतीनें केलेल्या कानू, त्या मुंबईच्या कायदे-कौन्सिलच्या पुढील बैठकीच्या अगोदर एक महिना मुंबई सरकारी गॅझेटांत प्रसिद्ध करण्यांत आलेल्या असल्याशिवाय अंमलांत येतां कामा नयेत, व त्या, सदरहू कौन्सिलच्या, त्याच्या पुढील बैठकींत मांडलेल्या ठरावाने रद्द केल्या जाण्यास किंवा दुरुस्त केल्या जाण्यास पात्र असतील. “
हेतु व कारणें यांचें निरूपण
या आक्टाच्या मसुद्यांचे हेतु पुढीलप्रमाणें आहेत :--
१. वहिवाटदार वतनदारांच्या मेहनतान्याबाबद अधिक चांगली तजवीज
करणें.
२. कनिष्ठ दर्ज्याच्या वंशपरंपरेच्या गांवकामगारांच्या वतनांचा बदला करण्यास परवानगी देणें.
३. बलुत्याचे पैशाच्या पट्टीत रूपांतर करण्याबाबद ठराव करणें.
४. कनिष्ठ दर्जाचें वतन धारण करणारांस, रयतांची चाकरी करण्याच्या पात्रतेपासून आपणां स्वतःस मुक्त करू देणें.
५. वहिवाटदार वतनदारांची कर्तव्यकर्मे निश्चित करणें.” १
' : बहिष्कृत भारत : ता. ७ डिसेंबर १९२८.