परिशिष्ट-४६
श्रीक्षेत्र काशी येथील ब्राह्मण महासंमेलनापुढे चर्चेसाठी
आलेली प्रश्नावली व तिचीं धर्मगुरूंनी
दिलेली निर्णयात्मक उत्तरे
श्रीक्षेत्र काशी येथे भरलेले अखिल भारत ब्राह्मण महासंमेलनापुढें आलेली प्रश्नावली व तिला धर्मगुरूंनी दिलेलीं उत्तरे यांचें मराठी भाषांतर पत्रकरूपानें नुकतेच प्रसिद्ध झालें असून त्याखाली रा. रंगाचार्य रेड्डी, गोपाळ शंकर दंडगांवकर, रंगनाथ शास्त्री नाशीककर, विश्वास बळंवत डावरे, विष्णू नारायण मवाळ, विद्याधर कृष्णाजी शहरकर व त्र्यंबक नरहर श्रीगोंदेकर यांच्या सह्या आहेत. ही मंडळी पुणें येथील विद्वत्सभा व शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मणसभा या संस्थांचे प्रतिनिधी म्हणून काशी येथील संमेलनास हजर होती. ही प्रश्नोत्तरें लोकांच्या माहितीसाठी पुढे दिलीं आहेत. त्यावरून काशीच्या या ब्राह्मण महासंमेलनाचें स्वरूप सर्वाना कळून येईलच. प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे आहेत :--
प्रश्न
१. स्त्रियांच्या व पुरुषांच्या विवाहकालाची मर्यादा कोठपासून कोठपर्यंत शास्त्रसंमत आहे ?
२. स्त्रीला. ऋतु प्राप्त झाल्यानंतर होणारा विवाह हा मुख्य का गौण का आपद्धर्म म्हणून समाजावयाचा ?
३. चालू परिस्थितीस व शास्त्रास अनुसरून विवाहकालमर्यादेचें नियमन (कायदा) करणें किती वयापर्यंत योग्य होईल ?
४. कन्येस ऋतु प्राप्त झाला असतां वृषलीत्व सांगणाऱ्या वचनांचा आशय काय ?
५. ब्राह्मणादिजातीमध्यें पोटजातींत परस्पर विवाह संबंध होणें शास्त्रसंमत आहे किंवा नाहीं ?
६. धर्मज्ञ कोण व ते कशा प्रकारचे धर्मपरिवर्तन करूं शकतात ? ( काय संकोचस्वरूपाचें अथवा प्रवृत्तिस्वरूपाचे ? )