व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 594

५४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

केसरीचे संपादकत्व आगरकरांकडे दिले गेले. ' आधी राजकीय की आधी सामाजिक ' या वादात टिळकांशी मतभेद होऊन सुधारणावादी आगरकरांनी १८८८ साली दसऱ्याच्या दिवशी ' सुधारक ' नावाचे वृत्तपत्र सुरु केले 'इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल तर ते करणार 'ह्या सुधारकी बाण्यामुळे त्यांच्या बाबतीत खुनाच्या धमक्या, जिवंतपणी प्रेतयात्रा वगैरे प्रकार झाले, परंतु लोकसेवेचे सुधारकी व्रत सुटले नाही. त्यांचे सुधारकातील व केसरीतील लेख प्रसिद्ध आहेत.

उदगावकर, डॉ. :-हिंदुमहासभेचे निष्ठावंत कार्यकर्ते. मुंबई हिंदुसभेचे सरचिटणीस. मुंबईच्या श्रद्धानंद अनाथ हिंदू महिलाश्रमाची अनेक वर्षे धुरा सांभाळली. हिंदुत्वाचे कट्टर अभिमानी.

एकनाथ :-(१५२१-१५९९) ज्ञानेश्वरानंतर व त्यांच्या खालोखाल योग्यतेचा हा संतकवी महाराष्ट्रात अत्यंत प्रिय आहे. वारकरी पंथात ज्ञानेश्‍वरी खालोखाल नाथांच्या भागवताला पूज्य मानले जाते. जन्म पैठण येथे व मृत्यूही तेथेच. देवगिरीचा जनार्दनपंत हा दत्तोपासक साधु यांच्या गुरू चतु:श्लोकी भागवतावरची टीका, भागवत एकादशस्कंध, रामायण, रुक्मिणी-स्वयंवर व अनेक आख्यानके व पदे यांनी रचली. त्यांची विशेष महत्त्वाची कामगिरी म्हणजे दुर्लभ व दुर्बोध झालेल्या ज्ञानेश्वरीची शुद्ध आवृती तयार करणे. हीच आवृत्ती आज लोकापुंढे आहे. यांची भारुडे ही रसाळ व रूपकात्मक आहे.

करंदीकर, जनार्दन सखाराम :-(१८७५-१९५९) शिक्षक, संशोधक, ज्योतिषशास्त्रज्ञ व संपादक. १९१५ मध्ये पुण्याच्या केसरीचे दुय्यम संपादक. १० जानेवारी १९३१ पासून प्रमुख संपादक, केसरी-मराठा संस्थेचे विश्वस्त टिळक, केळकरांच्या राजकीय विचारसरणीचे जाणकार पुरस्कर्ते. हिंदुत्वनिष्ठ. जगातील क्रांतिकारक युद्ध, कौटिलीय अर्थशास्त्र (मराठी भाषांतर), हिंदुत्ववाद, गीता तत्त्वमंजरी इत्यादी ग्रंथांचे कर्ते. काँग्रेस, लोकशाही स्वराज्य पक्ष व नंतर हिंदू महासभा यांचे समासद म्हणून कार्य.

कर्झन, लॉर्ड :--( १८९५-१९०५) एक अत्यंत हुषार, तडफदार परंतु साम्राज्यवादी व लष्करशाही प्रवृत्तीचा व्हाईसरॉय. याच्या कारकीर्दिला लो. टिळकांनी औरंगजेबाच्या कारकीर्दिची उपमा केसरीत दिली होती. उद्दाम व कडवी वृत्ती, मनुष्यस्वभावासंबंधीचे अनुदार धोरण, साम्राज्यशाहीची अनिवार हाव, लष्करी सामर्थ्याचा अमर्याद अहंकार आणि जित लोकांच्या प्रतिकारसामर्थ्यासंबंधी अत्यंत तुच्छताबुद्धी. तरी पण पुराणवस्तु संरक्षणाचा कायदा पास करुन, जुन्या वस्तु, इमारती, स्तंभ वगैरेंचे संरक्षण करण्यासाठी त्याचप्रमाणे या बाबतीत नवीन शोध करण्यासाठी योग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्याने भारतावर उपकारच केले.