व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 600

५५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

विजापूर जिल्ह्यात प्रांत ऑफिसर म्हणून १९२७ साली सरकारी हुद्याची जागा मिळू शकली. सरकारी मोठ्या हुद्यावर नेमले गेलेले पहिले अस्पृश्य गृहस्थ म्हणून त्यांच्याकडे मान जातो.

जाधव, भास्करराव :--' राजर्षि छत्रपति शाहु महाराज यांच्या ब्राह्मणी वर्चस्व नष्ट करण्याऱ्या चळवळीतून ब्राह्मणेतर पक्ष मद्रास व मुंबई इलाख्यांत उत्पन्न झाला. मद्रासच्या ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी प्रथम सर शंकरन्‌ नायर व नंतर इतर लोक झाले. त्यांचा ब्राह्मणेतर पक्ष इतका प्रबळ झाला की त्याला जस्टिस पार्टी हे नाव धारण करून मद्रासमध्ये राज्यकारभार हाती घेता आला. त्याचे कारण, मद्रासमध्ये ब्राह्मणेतरांत शिक्षणप्रसार फार झालेला होता. मुंबई इलाख्यात ब्राह्मणेतर पक्षाचे प्रथमचे पुढारी श्री. भास्करराव विठोजीराव जाधव व नंतर दुसरे होते.

भास्कररावांचा जन्म १७-६-१८६७ ला नागाव, तालुका अलिबाग, जिल्हा कुलाबा येथे झाला. त्यांना विद्यार्जनासाठी अत्यंत त्रास सोसावा लागला व कष्ट करावे लागले. ते एल्फिन्स्टन हायस्कूलमधून जून १८८८ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप, तीन गुण कमी पडल्यामुळे त्यांना मिळाली नाही. सरकारची १५ रुपयांची व डेक्कन मराठा असोसिएशनची १५ रुपयांची अशा दोन शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी आपला कॉलेजमधील अभ्यास (वुइल्सन व एल्फिन्स्टन) पुरा केला. ते १८९२ मध्ये बी. ए. ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. ते १८९३ व १८९४ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजात दक्षिण फेलो (संस्कृत) होते. ते १८९४ साली एम्‌. ए. झाले. ब्राह्मणेतर समाजातून इतक्या नेत्रदीपक प्रकाशाने चमकणाऱ्या बुद्धिमान तरुणाकडे बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराज व कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांचे लक्ष वेधले. श्रीमंत सयाजीरावांच्या प्रेमळ जाळ्यात ते अडकू शकले नाहीत, पण श्रीमंत शाहू महाराजांनी त्यांच्या सभोवती असे जाळे टाकले की त्यातून त्यांना निसटता आले नाही ते १८९५ च्या जुलैपासून कोल्हापूरच्या नोकरीत रूजू झाले. ते १८९७ साली एल्‌.एल्‌. बी. झाले

कोल्हापूरचे वातावरण म्हणजे सामाजिक व धार्मिक सुधारणावादी. श्री. भास्करराव जाधव हे याच विचारांचे असल्यामुळे ते आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते होते. प्रि. गोविंद चिमाजी भाटे (ब्राह्मण) यांनी मराठ्याच्या मुलीशी विवाह करण्याचे ठरविले तेव्हा भास्कररावांनी विवाहात सदर मुलीचे कन्यादान केले.