५५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
व दिवेकर, महादेवशास्त्री :--गाढे पंडित, हिंदु समाज, धर्म संस्कृतीचे अभिमानी. वाई येथे हिंदुसमाजोद्धारक संस्थेची स्थापना. आर्य संस्कृतीचा उत्कर्षापकर्ष, सनातन धर्म, हिंदू संस्कृती इत्यादी ग्रंथांचे लेखक. अस्पृश्यांच्या चळवळीसंबंधी बाबासाहेबांची नोव्हेंबर १९२९ मध्ये मुलाखत त्यांनी घेतली होती.
देशमुख, लोकहितवादी गोपाळराव हरि (१८२३-१८९२) :--अव्वल इंग्रजीतील एक मान्यवर पुढारी व लेखक. नोकरीत न्यायाधिशाच्या जागेपर्यंत चढले व सरकार दरबारी रावबहादुरकीही मिळविली. भाऊ महाजन यांच्या मुंबई येथील 'प्रभाकर' या वृत्तपत्रातून 'लोकहितवादी' या टोपण नावाने त्यांनी १८४८ पासून 'शतपत्रे' लिहिण्यास सुरूवात केली. तत्कालीन ब्राह्मणांची अवनती, पुराणातील वेडेचार, सनातनी, प्रगतिविन्मुख, बुरसलेली डोकी यांवर त्यांनी सपाटून मारा केला. लोकहितवादी म्हणूनच पुढे ते नावाजले गेले. त्यांनी विविध विषयावर ग्रंथसंपदा निर्माण केली. लोकहितवादी यांच्या शतपत्रांचे पुनर्मुद्रण 'बहिष्कृत भारत' च्या दि. ७ डिसेंबर १९२८ पासून बाबासाहेबांनी सुरू केले. पुनर्मुद्रणाचा हा असा पहिलाच प्रयत्न होता.
धनुर्दास :--त्रिचनापल्ली जवळ असलेल्या उरस्युर गावी धनुर्दास नावाचा शूद्र राहत असे. त्याला त्याच्या स्त्रीसह पंचसंस्कार करून श्रीरामानुजाचार्यांनी आपला शिष्य करून घेतले.
धारिया, शंकर विठ्ठल :--पुरोगामी, सुधारक मताचे महाड येथील व्यापारी. मुंबईतील ख्यातनाम बॅरिस्टर का. शं. धारिया यांचे वडील.
नंदी, महाराज मुनिद्रचंद्र :--कासीम बझार येथील मीरत विभागाचे सरसुभे सुविख्यात महाराजा मुनिद्रचंद्र नंदी.
नाईक, देवराव विष्णु :--जातीनें गोवर्धन ब्राह्मण गृहस्थ. मुंबईत 'संजीवनी' नावाचे मासिक व 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर ' नावाचे पाक्षिक चालविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शखाली निघणाऱ्या 'समता' ह्या पाक्षिकाचे ते संपादक होते. त्याचप्रमाणे २४ नोव्हेंबर १९३० ला सुरू झालेल्या 'जनता' ह्या पाक्षिकाचे व नंतर रूपांतरित झालेल्या साप्ताहिकाचे काही वर्ष संपादक होते.
नागनाक, सेटी बिन :--महाराष्ट्राच्या पुरातन ग्रामसंस्थेत अस्पृश्य मानलेल्या जातीचे महत्त्व होते. त्यातल्या त्यात महार जात महाराष्ट्रात मुख्य बलुतेदार म्हणूनच नव्हें तर वतनदार म्हणून नांदत होती, ह्यासंबंधी काही पुरावे आढळतात. त्या इतरांनी कालवशात बळकावल्या. अशा वतनाचा वाद माजला असता, अव्वल मराठेशाहीत कोणते तरी दिव्य करून आपला हक्क