व्यक्ती, संस्था, कार्य - सूची | ५६१
प्रार्थना समाज :--१७ डिसेंबर १८६६ रोजी प्रसिद्ध व्याकरणकार रा. ब. दादोबा पांडुरंग यांचे बंधु डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या घरी एकूण ११ गृहस्थांची (डॉ. तर्खड, बोडसे, शिरगावकर, संजगिरी, वागळे, भागवत, परमानंद, मानकर, पडवळ, चोळकर, नवरंगे) एक सभा होऊन जातिभेद, बालविवाह, विधवाविवाह, अशासारख्या सामाजिक गोष्टीवर भर न देता, परमार्थसाधनेकडेच विशेष लक्ष देणारा नवापंथ स्थापन करण्याचे ठरून त्याप्रमाणे फाल्गुन वद्य ११, शके १७८८ रविवार, ३१ मार्च १८६७ रोजी ' पापमोचनी ' च्या सुमुहूर्तावर परमहंससभेचे “ प्रार्थनासमाज “ हे प्रकट स्वरूप प्रकट झाले. या दिवशी आनंदाश्रम स्वामी नामाचे एक बंगाली गृहस्थ आशीर्वाद देण्यास हजर होते. पावभक्षण विधीसारखा क्षोभकारक प्रवेश विधी ठेवला नव्हता. सुरवातीची सभासद संख्या फक्त २५ होती. हे सभासद सर्वच परमहंससभेचे जुने सभासद होते. १८५० साली परमहंससभा या नावाची रामचंद्र बाळकृष्ण (जयकर) यांनी मुंबईस एक गुप्त संस्था स्थापन केली होती. दादोबा पांडुरंग हे त्या सभेचे मुंबईतील प्रमुख होते. या सभेचे कार्य गुप्त रीतीने चाले. या सभेचे सभासद म्हणजे मुख्यतः इंग्रजी शिकणारे सुमारे सोळा वर्षाचे तरुण असत. परमहंससभेचे मुख्य उद्देश होते, विधवाविवाह ज्या जातीमध्ये चालू नाही तेथे तो चालू करणे, जातिभेद मोडणे आणि जगाचा चालक अशा एकाच परमेश्वराची पूजा करणे. या सभेचे विधी म्हणजे, प्रत्येक सभेच्या सुरुवातीस व अखेरीस प्रार्थना म्हणत व त्या मराठीत असत. एखाद्या माणसाला परमहंसमंडळीत प्रवेश द्यावयाचा असला म्हणजे एकदोन सभासद त्याला आधी ठराविक जागी व वेळी बोलावीत आणि पोर्तुगिज बेकरीतून पाव आणून तो बरोबर एकत्र खात. या कसोटीस तो उतरला म्हणजे अमूक माणसाने जात मोडली असे प्रमुखाला कळवीत. नंतर पुढच्या सभेस त्याला हजर करीत व त्याला सभेची उद्दिष्टे मान्य आहेत की काय हे विचारून त्याचे होकारार्थी उत्तर आल्यावर त्याच्या हातावर पाणी ओतीत व ते जमिनीवर सोडावयास सांगत. जातिभेद व इतर धार्मिक खुळचट समजुतींचा त्याग केल्याचे ते लक्षण होते. त्याच्या निष्ठेची पुन्हा प्रचीती पाहण्याकरिता पुन्हा पाव आणून त्याच्या फाका करीत व सर्व सभासद ते खात. परमहंससभेच्या शाखा पुणे, सातारा, अहमदनगर वगैरे ठिकाणी होत्या. या परमहंससभेचे सभासद डॉ. सर रामकृष्णपंत भांडारकर, बाबा पदमनजी, नारायण रघुनाथ विजयकर, भिकोबा लक्ष्मण, सखाराम लक्ष्मण, लक्ष्मणशास्त्री हळवे, सखारामशास्त्री, बाळ भास्कर शिंत्रे, मदन श्रीकृष्ण, इ. होते. हेच पुढे प्रार्थना समाजाचेही सभासद होते. १८७४ साली प्रार्थना समाजाचे प्रार्थनागृह उभे राहिले. प्रार्थना समाजाच्या नेतृत्वाखाली ' सुबोध पत्रिका ' हे साप्ताहिक मामा परमानंद यांनी चालू केले. ता. ४ मे १८७३ रोजी पहिला आठ पानी अंक निघाला.