५७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तेव्हा सरदार आपआपल्या लोकांसह मिसली प्रमाणे उतरले. शिदनाकाच्या गोटात आसपास दुसऱ्या ब्राह्मण व मराठा सरदारांचे गोट होते. पेशवाईत सोवळ्याओवळ्याचा विचार बराच वाढत चालला होता, त्यामुळे कित्येकांनी सवाई माधवराव कचेरीच्या डेऱ्यात बसले असता, विनंती केली की, महारांचा गोट मध्येच आहे तो बाजूस काढावा. पेशव्यांनी विनंती ऐकून आपल्या बाजूस बसलेल्या हिरोजी पाटणकर नावाच्या वयोवृद्ध सरदाराकडे पाहिले. तेव्हा तो मराठा बोलला की ही जेवणाची पंगत नव्हे, म्हणून मध्येच महाराचा गोट असल्यास हरकत नाही. ही तरवार धरणाऱ्या शूरांची पंगत आहे. येथे जातीचा विचार नाही. ' ज्यांची तलवार खंबीर तो हंबीर * . . . . पुढे लढाई चालू झाली. परशुराम भाऊवर पठाणांनी मोठी गर्दी करून भाऊस घोड्यावरून खाली आणिले. त्यावेळी मराठे व पठाण ह्यांची जी चकमक झाली तीत शिदनाकाने अप्रतिम शौर्य दाखविले. त्याची पटवर्धन मंडळीने मोठी तारीफ केली. पेशवाई बुडाल्यावरही हा शिदनाक बरीच वर्षे होता. चिंतामणराव अप्पा सांगलीकर दुखण्याने फार आजारी असता, त्यांच्या भेटीस हा गेला होता. तेव्हा त्यांनी मोठ्या समारंभाने ह्याची मुलाखत घेतली. “ ( भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न - वि. रा. शिंदे, पान १५७-१५८. )
शांताबाई :--प. लो. डॉ. रामकृष्ण गोपाल भांडारकर यांची जेष्ठ कन्या शांताबाई. हिचा प्रथम विवाह डॉ. भाऊ दाजी यांचे धाकटे चिरंजीव द्वारकानाथ यांच्याशी झाला होता. पण ते १८७५ साली मृत्यु पावले व शांताबाई विधवा
झाल्या.
शिवतरकर, सीताराम नामदेव :--चर्मकार समाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारी. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ' बहिष्कृत हितकारिणी सभा ' या संस्थेचे जनरल सेक्रेटरी.
श्रद्धानंद, स्वामी (१८५६--१९२६) :--मूळ नाव लाला मुन्शीराम. पंजाबमधील तळवन या गावी जन्म. शिक्षण मॅँट्रिकपर्यंत. स्वामी दयानंद सरस्वतींच्या व्याख्यानाचा परिणाम होऊन १८८५ साली आर्य समाजाची दीक्षा, लाहोर येथे वकिली करीत असता ' सद्धर्मप्रचारक ' साप्ताहिकास सुरुवात. प्रथम उर्दूत व नंतर हिंदीत. त्यातून स्त्री-शिक्षण, विधवा-विवाह, अनाथ संरक्षण यावर मतप्रदर्शन. प्राचीन पद्धतीवर १९०९ च्या मार्चमध्ये गुरुकुलाची स्थापना. धर्मांतरित लोकांच्या शुद्धिकार्यासाठी खूप धडपड. १९१७ च्या एप्रिलमध्ये संन्यास.