व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 627

व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५७९

श्रीरामानुजाचार्य :--विशिष्टाद्वैत पंथाचे आद्य प्रवर्तक. जन्म इ. स. १०१६-१७ च्या दरम्यान तरुणपणी तो काचीपुर येथे राहत असून अद्वैतवादी ' यादवप्रकाश ' यांचा तो शिष्य होता. परंतु ओढा वैष्णव मताकडे. पुढे आळवारांच्या प्रबंधाचे अध्ययन केले. यमुनाचार्यांच्या मागून गादीवर आल्यावर तो त्रिचनापल्लीजवळ श्रीरंगम्‌ येथे राहिला व तेथेच आपल्या आयुष्यातील मुख्य कार्य केले. उतारवयात चोल राजाकडून छळ. रामानुजाचार्यानी वेदांतसार, वेदार्थसंग्रह, वेदान्तदीप, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता यावरील भाष्ये इतकी ग्रंथरचना केली. त्यांनी ब्रह्मसूत्रे व उपनिषदे यांचा आधार घेऊन, जीवात्मा अगर चित्‌, निर्जीव जग अगर अचित्‌ व परमात्मा अगर ईश्वर ही तीन तत्त्वे शाश्वत होत हा

सिद्धान्त मांडला.

सकट के. के. :--बेताचे शिक्षण असलेले पुण्यातील मातंग समाजाचे

पुढारी. पुणे हिंदू महासभेच्या पहिल्या कार्यकारिणीतील एक सभासद. महार जातीविषयी काहीसा आकस व अविश्वास म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीत्व कधीच स्वीकारले नाही एवढेच नव्हे तर विरोध केला.

सहस्त्रबुद्धे, गंगाधर निळकंठ :--जातीने ब्राह्मण. महाडच्या सत्याग्रह परिषदेत दि. २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती दहनाचा ठराव मांडून ह्यांच्याच हस्ते बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करविले होते. जनता ह्या साप्ताहिकाचे काही वर्ष संपादक राहिले होते.

सामाजिक परिषद :--राजकीय प्रगतीसारखेच सामाजिक सुधारणासंबंधी काँग्रेसच्या अधिवेशनात विचारविनियम व ठराव करण्यात यावेत असा दृष्टिकोन असणारे काही गृहस्थ होते. त्यांनी असा विचार मांडला व काँग्रेसच्या सूत्रधारांनी तो मान्य केला. १८८७ च्या डिसेंबरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन मद्रासला भरले, तेव्हा त्यात सामाजिक परिषद पहिल्यांदा भरविण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष राजा सर टी. माधवराव हे होते. १८८७ पासून १८९४ पर्यंत या परिषदा काँग्रेसच्या मंडपात भरविण्यात आल्या. १८९५ चे अधिवेशन भरविण्याचे ठरले तेव्हा सामाजिक परिषदेचे अधिवेशन काँग्रेसच्या मंडपात भरू द्यावयाचे नाही, असा पुण्यातील जीर्णमतवाद्यांनी चंग बांधला. सामाजिक परिषदेच्या मंडपाला आग लावू अशा धमक्या दिल्या. त्यामुळे सालाबादाप्रमाणे काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषद न भरता ती पोलीस संरक्षणात वेगळी भरविली गेली. तेव्हापासून सामाजिक परिषदा वेगळ्याच भरविल्या जाऊ लागल्या.