व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 628

५८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सायमन कमिशन :--हिंदुस्थानच्या शासनपद्धतीत व १९१९ च्या माँटेग्युचेम्सफोर्ड सुधारणा कायद्यात कोणते फेरफार करणे आवश्यक आहे, याविषयी पार्लमेंटला शिफारशी करण्यासाठी, इंग्लंडातील हुजुर पक्षाचे पंतप्रधान स्टॅनले बाल्डविन यांनी ता. २६।११।१९२७ रोजी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली, तेच सायमन कमिशन होय. या कमिशनचे सहाही : सभासद इंग्रज होते, त्यावर एकाही हिंदी माणसाची नेमणूक करण्यात आली नव्हती म्हणून हिंदुस्थानातील सर्व राजकीय पक्षांनी या कमिशनवर बहिष्कार टाकला होता. सायमन मंडळाला त्याच्या कार्यात सहकार्य देण्यास केद्र सरकारने एक अखिल भारतीय समिती नेमली होती. शिवाय मंडळासंगे कामकाज करण्यासाठी प्रत्येक विधिमंडळाने आपापली समिती नेमली होती. मुंबई प्रांतिक समितीवर ३ ऑगस्ट १९२८ रोजी इतर सभासदांबरोबर डॉ. आंबेडकरांचीही निवड झाली. त्यांनी मंडळाला पूर्ण सहकार्य केले आणि आपली साक्ष सुद्धा दिली.

सेवासदन सोसायटी :--श्री. गोपाळ कृष्ण उर्फ बाबासाहेब देवधर, सी. आय्‌. $., एम्‌. ए. यांनी ह्या संस्थेची पुण्यास २।११।१९०९ रोजी स्थापना केली. आरंभी ही संस्था मुंबईच्या सेवासदनाची शाखा म्हणून सुरू झाली. पुढे ती १२।१०।१९१७ रोजी पूर्णपणे स्वतंत्र झाली. श्री. देवधर हे येथील लष्करामध्ये १८९२ साली खिश्चन मिशनरी संस्थेमार्फत चालविलेल्या अँग्लोव्हर्न्याक्युलर शाळेचे मुख्याध्यापक होते. मिशनरी मंडळीची स्त्रीशिक्षणाविषयीची आस्था पाहून त्यांना तसलेच कार्य करण्याची स्फूर्ती झालीं. स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवावे व तेच कार्य पुढेही तसेच चालू ठेवावे याकरिता स्त्रीशिक्षणाचे कार्य चालविणारी एखादी संस्था असण्याची त्यांची मनीषा जोराने पुढे येऊ लागली. सन १९०६ मध्ये श्री. देवधर हे प्लेगची आपत्ती निवारण्याची खटपट करीत होते. स्त्री-वर्गाला मदत करण्यासाठी एक स्त्री स्वयंसेविका दल स्थापन केले. त्यात सर्व जातीच्या, धर्माच्या स्त्रिया होत्या. त्यात रमाबाई रानडे, 'अन्नपूर्णाबाई आपटे, जानकीबाई भट, सीताबाई परांजपे, सीताबाई डुकले, मिस्‌ सोराबजी, मिस्‌ हिराबाई पदमजी आणि सीताबाई भांडारकर ह्या प्रमुख होत्या. पुढे ह्याच स्त्रीमंडळाचे रूपांतर सेवासदन सोसायटीत झाले. आरंभीचा वर्ग प्रौढ विधवा स्त्रियांचाच असून त्यात प्राथमिक शिक्षण दिले जाई. पुढे सर्व प्रकारच्या स्त्रियांकरिता विविध प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आरंभी फक्त १५ विद्यार्थिनी होत्या. यांच्या शाखा - अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बारामती, अलिबाग, नागपूर, सातारा, ग्वाल्हेर, मुंबई येथे गिरगाव, दादर, फोर्ट या ठिकाणी.