८
हें स्वराज्य नव्हे, हें तर आमच्यावर राज्य !
गेल्या अंकांत राष्ट्रीय सभा-जिला काँग्रेस असें म्हणतात-तिच्या वाढत्या भुकेचा अनुवाद झाला. ब्रिटिश राज्यपद्धति सुराज्यपद्धति करण्यासाठीं जरी ती जन्मास आली तरी कालमानपरत्वें सुराज्याच्या ऐवजीं मागणी करून तिनें स्वराज्याची देणगी मिळविलीहि आहे ; व ती अवमानितां जरी येत नाहीं, तरी पण ती उपयुक्त आहे कीं नाहीं, हें ठरविणें अगदीं जरूर आहे. देणगीचा अपायकारक परिणाम कसा घडू शकतो हें ज्यांना शंकरानें भाळून जाऊन भस्मासुराला दिलेल्या देणगीनें इतरांचीच नव्हे खुद्द शंकराचीच कशी त्रेधा उडाली हें माहीत आहे त्यांना विशद करून सांगण्याची जरूरी नाहीं. म्हणूनच त्यांतील मर्म ज्यांनीं जाणलें आहे त्यांनीं या स्वराज्याच्या मागणीच्या मुळाशीं असलेल्या हेतूंचें परिशीलन करणें अगदीं आवश्यक आहे. त्याशिवाय ही देणगी साधक आहे कीं बाधक आहे, या महत्त्वाच्या प्रश्नाचा निकाल देणें जड जाईल. हें ठरविण्यास ब्रिटिश अमदानी वाईट कां ? याचा उलगडा झाला म्हणजे त्याचपक्षी स्वराज्याच्या हेतूंचाहि उलगडा होतोच आहे. म्हणून तोच प्रश्न अग्रस्थानी मांडून त्याची छाननी करणें बरं पडेल.
कांहीं दुराग्रही हरीचे लाल वजा जातां आतांपर्यंत झालेल्या राज्यकारभारांतील सुधारणांत कांहींच राम नाहीं असें म्हणणारे लोक या राष्ट्रीय सभेंत नाहींत हे सुदैवच म्हणावयाचें. त्यांबद्दल ही राष्ट्रीय सभा कृतज्ञ आहे कीं नाहीं हा प्रश्न निराळा ; परंतु या सभेचें समाधान कां होत नाहीं, हें निश्चित करण्यास तिच्या ठरावांत वर्षावर्षी होत असलेल्या ब्रिटिश राज्यकारभारांतील दोषाविष्करणाकडे लक्ष्य पुरविलें असतां असें दिसून येतें कीं, ब्रिटिश अमदानींतील wort दारिद्र्य व तिची निस्तेज मनोभूमिका हीं दोन तिच्या असंतोषाचीं महत्त्वाची कारणें होत. स्वराज्यवादी यांच्या प्रमाणेच प्रजा सुखसंपन्न होऊन तिची मनोभूमिका सतेज होणें हीं मानवोन्नतीचीं आद्य कारणें आहेत असें आमचेंहि पण मत आहे. आणि त्याला स्वराज्याशिवाय दुसरा जर उपायच नाहीं तर ईश्वर करो आणि स्वराज्यवादीयांच्या तोंडांत साखर पडो असा आशावाद गाणें भाग पडतें. पण त्यांच्या तोंडांत साखर टाकण्यास आजच आम्ही तयार नाहीं. कारण “ जें जें इच्छी प्राणी तें तें पुरवी चक्रपाणी “ असें जरी साधुसंतांनीं उपदेशिलें