हें स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य ! - Page 68

२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्याच्या ऐवजी आपल्याला नाहीं पण परकीयांना स्वल्पांत साध्य होणारा माल घेणें ही अनियंत्रित व्यापारपद्धति सर्व अर्थशास्त्रज्ञांना मान्य आहे. यावरून जो माल आपल्याला अल्प मोलानें तयार करितां येत नाहीं तो ज्यांना तसा करितां येतो त्यांपासून विकत घेण्याऐवजीं स्वदेशींच तयार करण्याचा हेका धरल्यानें तोटाच होणार, हें निर्विवाद आहे. असें जरी आहे तरी पण हिंदुस्थानांतील स्वराज्यवादीयांस तें कबूल नाहीं. त्यांच्या मतें हिंदुस्थानांतील स्वराज्यवादीयांस तें कबूल नाही. त्यांच्या मतें हिंदुस्थानांत संपत्तीची वाढ होण्यास हल्लीं आयात होत असलेला माल हिंदुस्थानांतच तयार झाला पाहिजे. तो तयार होण्यास आयात मालावर प्रतिबंध ठेवणें किंवा जकात ठेवणें अगदीं जरूर आहे, त्याशिवाय अन्य मार्ग नाहीं, असे त्यांनी वेळोवेळीं प्रतिपादिले आहे. प्रतिबंध ठेऊन किंवा जकात बसवून परदेशी मालाची आयात कमी झाली म्हणजे स्वदेशी माल उत्पन्न करून ही तूट भरून काढण्यास सहजीं स्थापन होणारे धंदे व कारखाने वाढून हा दरिद्री देश सधन होईल अशीं प्रवचनें सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनीं नियंत्रित व्यापार पद्धतीचे पूर्ण स्वरुप पाहिलेंच नसावेंसें दिसते. पण आम्हाला तें पाहिल्याखेरीज गत्यंतर नाहीं. परदेशी माल आयात होतो याचें कारण तो कमी किमतींत मिळतो. तसाच माल स्वदेशांत उत्पन्न होत नाहीं याचें कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारांत परदेशी मालापुढें त्याचा टिकाव लागत नाहीं. त्याचा टिकाव लागावा म्हणून तर परदेशी मालास अटकाव करा ह्या महा- मंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकास अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणें भाग पडेल याचा विचार करावा कोणीं ? परदेशी मालाच्या ऐवजीं स्वदेशी माल खपून स्वदेशी धंदे आणि कारखाने स्थायिक होतील ; परंतु त्यांपासून देशाचें कल्याण होईल असें म्हणण्याऐवजीं देशांतील भांडवलवाल्यांचें कल्याण होईल, असें म्हणणें अधिक यथार्थ होणार आहे. कारण अनियंत्रित व्यापारपद्धतींत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापारपद्धतींत गोरगरिबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यांत त्यांची होणारी नागवण ' स्वदेशी ' या लाडक्या शब्दानें भरून निघेल असें मानून ते समाधान पावतील असें संभवत नाहीं. ज्यांची नागवणूक होणार त्यांत बहुतांशी बहिष्कूतांचाच समावेश होत असल्यामुळें त्यांचा खिसा HAMA इतरांचे कल्याण करून त्यांत सर्व देशाचें कल्याण झालें असें भासविणाऱ्यांच्या हातचलाखीला ते फसून जातील असें जर स्वराज्यवादीयांस वाटत असेल तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे. स्वराज्याच्या या उपायानें दारिद्रय जाईल असें मानून स्वराज्य मागण्याइतके वेडे ते खास नाहींत. कारण सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोंवेलसाच भासतो.