हें स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य ! - Page 70

२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

असें सुचविणाऱ्या वातावरणांत दिवस काढावे लागत आहेत, आणि परिस्थितीला मान देण्यासाठीं त्यांच्यांतील कर्तव्यत्वान्‌ पुरुषांस देखील खालचा दर्जा पतकरावा लागत आहे. अशा परिस्थितींत त्यांच्यांत पूर्ण व्यक्तिविकास होणें शक्‍य नाही. स्वराज्याखालीं वसत असलेल्या लोकांत दिसून येत असलेल्या आत्मबलाचा प्रभाव अनुभविण्यास त्यांना संधिच नाहीं. इंग्रजांच्या राज्यकारभारांतील वर्चस्वामुठे होत असलेली खच्ची बंद पडण्यास व त्यांच्यांत स्वाभिमान उत्पन्न होण्यास स्वराज्याची आवश्यकता आहे हें कबूल करण्यास फारशी अडचण पडणार नाहीं, आणि आमच्या मतें स्वराज्याच्या या दोन कारणांत हेंच कारण सबल आहे. व्यक्तिविकास करण्याचा उपाय म्हणून स्वराज्य दिल्यास आमची ना नाहीं, परंतु जर इंग्रजी राज्याविरूद्ध घेतलेला हा आक्षेप ब्राह्मणांच्या मुखांत एकपटीनें शोभतो तर तोच आक्षेप बाह्मणी राज्याच्याविरूद्ध एखाद्या बहिष्कृतानें घेतल्यास हजार पटीनें शोभेल, यास खोटें म्हणणारा पामर सांपडेलसें दिसत नाहीं. म्हणूनच ज्या स्वराज्यवादीयांना व्यक्तिविकासाची एवढी चाड आहे व ज्यासाठी ते बंदीवासहि भोगीत आले त्यांनीं सहा कोटि बहिष्कृत लोकांस व्यक्तिविकासाचा मार्ग खुला करण्यास काय केलें आहे, असा उलट प्रश्‍न विचारणें भाग पडतें. जशी परकीय अमलामुळें हिंदी जनांत उद्भूत होत असलेली सूक्ष्म हीनता या राष्ट्रीयसभेस दिसते तशीं स्वकीयांच्या अमलामुळें या बहिष्कृत लोकांत उद्भूत होत असलेली हीनता कां दिसू नये ? कदाचित्‌ ती इतकी ढोबळ आणि लखलखीत असावी कीं, तिच्या प्रखरतेमुळें ब्राह्मणांचे डोळेच दिपून जात असावेत; किंवा तिकडे पहाण्याची त्यांची इच्छाच नसावी. या दोहोंपैकी दुसराच तर्क खरा आहे असें सिद्ध होतें. परकीयांच्या दास्यातून मुक्त करण्यास धडपडणाऱ्या या राष्ट्रीय सभेनें स्वकीयांना स्वकीयांच्या दास्यातून काढण्याच्या प्रयत्नांचे संशोधन केलें असतां स्पष्ट होतें कीं, त्याचें दास्य कायम करण्यासच तिचें अंग आहे. या राष्ट्रीय सभेची जेव्हां स्थापना झाली तेव्हां तिच्या कार्यक्रमाबद्दल बराच वाद उत्पन्न झाला होता. राजकीय मागण्या मागाव्या किंवा सामाजिक दास्यांत अडकून पडलेल्या देशबांधवांस सोडविण्यांचा प्रयत्न करावा हा लढा बरेच दिवस पर्यंत चालू होता, परंतु ज्या या सभेंत ब्रह्मवृंदांचा जास्त भरणा होता व आहेहि तिनें आपल्या शीलानुसार स्वकीयांचें स्वस्थापित दास्यविमोचनाचें महत्कार्य फेंटाळून लावून तें दास्य कायम ठेवण्याच्या आड येत असलेला आपल्यावरील परकीयांचा तेवढा राजकीय, शहा नाबूद करण्याचा निंद्य पण सोयिस्कर मार्ग अवलंबिला हें सर्वश्रुत आहे. ज्या कांही व्यक्तींना सामाजिक सुधारणा घडवून आणणें विशेष महत्त्वाचे वाटत होतें त्यांनां “ सामाजिक परिषद ” या नांवाची एक निराळीच संस्था स्थापावी लागली. जरी