हें स्वराज्य नव्हे, हें तर आमच्यावर राज्य ! २७
आजतागायत या सामाजिक परिषदेच्या हेतूंचे क्षेत्र अगदीं मर्यादित होतें. म्हणजे बालविवाह, विधवाविवाह, समुद्रप्रयाण, इत्यादि ब्राह्मणांच्या सत्तेला तिळभर देखील धक्का न देणारें होतें तरी तिची राष्ट्रीय सभेकडून नेहमीं अवहेलनाच होत असे, व १८९५ सालीं तर तिचें नवें अधिवेशन जेव्हां पुणें शहरीं झालें तेव्हां पुणेकर राष्ट्रभक्तांनी नेहमींच्या पद्धतीस न जुमानतां तिला राष्ट्रीय सभेच्या मंडपांत भरून त्याला विटाळण्यास मनाई करून आपला क्षोभ व शील हीं व्यक्त केलीं. ब्रिटिशांचे राजकीय स्वामित्व जितकें वरिष्ठ हिंदूंच्या महत्त्वाकांक्षेच्या
आड येत असेल त्याच्या हजारों पटीनें वरिष्ठ हिंदूचें सामाजिक व धार्मिक वर्चस्व
या ६ कोटि बहिष्कृत वर्गाच्या कसें आड येत आहे हें या स्वहितसाधु अधमांना पटवून द्यावयास पाहिजे असें नाहीं. जीं सामाजिक बंधनें वरिष्ठ हिंदूस पोषक झालीं आहेत तीं, या बहिष्कृत वर्गास इतकीं मारक झालीं आहेत कीं, त्यामुळें हा वर्ग नागरिकत्वासहि दुरावला आहे. कोणत्याहि व्यक्तीस नागरिक म्हणविण्यास कांहीं हकक असावे लागतात. त्यांत (१) वैयक्तिक स्वातंत्र्य, (२) वैयक्तिक संरक्षण, (३) खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क, (४) कायद्याच्या बाबतींत समता, (५) सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून वागण्याची मोकळीक, (६) भाषणस्वातंत्र्य व मतस्वातंत्र्य, (७) सभा भरविण्याचा हक्क, (८) देशाच्या राजकारभारांत प्रतिनिधि पाठविण्याचा हक्क, आणि (९) सरकारी नौकरी मिळविण्याचा हक्क, यांचा अंतर्भाव होतो. परंतु सामाजिक बंधनामुळें वरील हक्कांतील बऱ्याच हक्कांना बहिष्कृत लोक आंचवले आहेत. ब्रिटिश आमदानींत पहिल्या दोन हक्कांची अंमलबजावणी जरी सर्वत्र होत आहे तरी केव्हां केव्हां उंच वर्णीय हिंदू अंमलदारांच्या क्षेत्रांत हें आपले हक्क नाबूद झाल्याचीं उदाहरणें या बहिष्कृत वर्गातील लोक दाखवूं शकणार नाहींत असें नाहीं. तसेच कायद्याच्या बाबतींत सर्वच ठिकाणीं बहिष्कृत व इतर लोकांत समता ठेविली जाते हें म्हणणें सर्वांशी खरें ठरेल असेंहि वाटत नाहीं. हक्क नं. ५-६-७-८ हे जरी सर्व हिंदी लोकांना मर्यादित प्रमाणांतच दिलेले आहेत तरी ते बहिष्कृत वर्गाच्या पदरांत इतरांपेक्षां बन्याच कमी प्रमाणांत पडतात. मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य किवा सभा भरविण्याचा हक्क प्रस्थापित राज्यास घातक होईल ह्या रीतीनें अमलांत आणण्यास कोणासच मुभा नाहीं, त्याप्रमाणें बहिष्कृत वर्गांसहि नाहीं, व ती त्यांना नकोहि आहे. तरीपण या हक्काचा त्यांनीं वरिष्ठ हिंदूचे प्रस्थापित सामाजिक दडपणाविरूद्ध उपयोग केला तर त्यांना होत असलेल्या मनाईमुळे त्यांचा जसा तोटा होतो तसा इतरांचा कांही होत नाहीं. सरकारी नौकरी मिळण्याचा हक्क असूननसून सारखाच आहे. कारण स्पर्शास्पर्शभावनेमुळे त्यांना ती मिळत नाहीं. ज्या या बहिष्कृत लोकांनीं लष्करांत भरती होऊन ब्रिटिशांस हिंदुस्थानचे