३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सांगून लो. टिळकांनीं सर्वांस चपापून टाकलें, व आपण बहिष्कृतांच्या आड येतों असें म्हणणारांचें तोंड बंद केलें. लो. नामदार खापर्डे "' तप्तेने तप्तायसा घटणाय योग्यम्, '' लोखंडाचे तुकडे लाल झाल्यावरच ते एकजीव होऊं शकतात, त्याचप्रमाणें तुम्ही आम्ही तापलों आहों तर आतां एकजीव होऊया म्हणून काकुळतीस आले. परंतु काम संपल्यानंतर लो. टिळकांनीं जाहीरनाम्यावर सही करण्याचें नाकारिलें ? त्यांचेच वळण ज्यांनीं घेतलें आहे असे लो. नामदार खापर्डे विलायतेहून स्वराज्याचे गाठोडें घेऊन आल्यानंतर ता. १७-१-१९२० रोजीं पुणे येथें तें चोरण्यास काँग्रेसच्या डेप्युटेशननें कशी मदत केली या विषयावर दिलेल्या जाहिर व्याख्यानांत ते म्हणाले, “ राज्यसुधारणांच्या विचारांत काँग्रेसचे शिष्ट गेले तेव्हां इतरांनाहि जाण्याची इच्छा झाली. नेमस्त धांवले, रंगू, साळू, मैना धावल्या. अंत्यजांनाहि स्वस्थ बसवले नाहीं. सर्वानींच विलायतेस गर्दी करून सोडली. अंत्यजांनांहि मागावयास जागा होती. ते प्रगतीसाठी मोठेपणा घेऊं पहात आहेत. "' ब्राह्मणोस्य मुखमासीत् “ या मंत्रानुसार रचलेल्या चातुर्वर्णाचे शेवटले भागीदार आज पहिल्या पदावर चढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पायाने डोक्यावरचें भूषण धारण करण्यासारखाच हा प्रयत्न आहे. पण त्यावांचून प्रगति कशी होणार. हे उपरोधिक बोल व अस्पृश्यता निवारक सभेंत केलेली केवीलवाणी याचना या परस्पर विरोधी शब्दावडंबरांचा जनिता एकच-आहे असें कोणाहि परक्या माणसास खरें वाटणार नाहीं ; परंतु ज्यांना लो. खापर्ङ्यांची नसनूनस ठाऊक आहे त्यांना लो. नामदार खापर्ड्यांची जिमला अशी परस्पर विरोधी वचनें वदण्यास कशी स्फुरण पावली याबद्दल मुळींच विस्मय वाटणार नाहीं. विंलायतेस जाण्यासाठी उसण्या आणलेल्या उदार विचाराच्या वाफेने आपला मुखचंद उजळ करून घेतला तो त्यांनी आपद्धर्म म्हणूनच करून घेतला असावा. नाहींतर परत आल्यावर अंतर्यामी दाबून धरलेल्या विचारावडंबरांचा प्रवाह सोडून देऊन आपला पूर्वीचा कलंक पुन्हां कां चढवून घेतला असता ? असें दुटप्पी वर्तन करणारे, वाच्यास पाठ देणारे, स्वार्थासाठी साधूचे सोंग घेणारे, कामासाठी मामा म्हणून साधल्यास उपकाऱ्यास अपकार करणारे, सत्याचा बदला शाठ्यांत देणारे लोक कोणत्या वर्णाचे हें निराळें सांगणें नकोच. ज्यांची त्यांनींच कबुली दिली आहे. म्हणूनच लो. बाप्टिष्टा कांहींहि म्हणोंत, विलायतेचें पाणी जरी प्याला तरी ब्राह्मण जातींवर गेल्याशिवाय रहाणार नाहीं, असा इशारा बहिष्कृत वर्गास वेळींच देणें बरें.
विविध-विचार : मूकनायक, शनिवार, ता. २८ फेब्रुवारी १९२०.
डब्ल्यू-२०७३-३ ब