३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
चढाओढीनें एक ब्राह्मण, एक ब्राह्मणेतर व एक बहिष्कृत असें तीन उमेदवार जर उभे राहिले तर ब्राह्मण लोक चुकुन देखील ब्राह्मणाशिवाय इतर कोणाला आपलें मत देणार नाहीत. त्यांच्या आंगीं वाणलेली ही स्वजातिहितपरायणता खरोखरच अनुकरणीय आहे. परंतु ब्राह्मणेतर व बहिष्कृत लोक अंधश्रद्धेच्या पायीं स्वज्ञातिहितास पराडःमुख होऊन आपलें मत ब्राह्मण उमेदवारास निःसंशय देतील. ब्राह्मण वर्गाची भक्ति इतर वर्गावर नाहीं पण ब्राह्मणेतरांची व बहिष्कृतांची भक्ति ब्राह्मणावर किती आहे हें सर्वश्रुत आहेच. अशा या संघटनामुळें ब्राह्मण उमेदवार आपल्या जातीच्या मतदारांच्या बलानेंच नव्हे तर त्यांना पूज्य मानणाऱ्या ब्राह्मणेतर व बहिष्कृत मतदारांच्या बलानें ब्राह्मणेतर बहिष्कृत उमेदवारास चीत करून निवडून येण्याचा प्रबल संभव आहे. म्हणूनच होणारी कायदे कौन्सिलें एकवर्णीय होतील असें कांही विव्दानांनी भाकीत केलें आहें. ज्याप्रमाणें मादक पदार्थ सेविल्यानें सेवन करणारांचें नुकसान होतें त्याचप्रमाणें ब्राह्मणवर्गावर जडलेली ब्राह्मणेतरांची व बहिष्कृतांची श्रद्धा विनाशक आहे. श्रद्धा ही दारू इतकीच अभक्ष्यभक्ष आहे. दारू प्याल्यानें जसें त्यांचे नुकसान होतें तसेंच स्वजातीयांना टाकून ब्राह्मणाला मत देण्याकडे जी त्यांची प्रवृत्ति आहे त्या पासूनहि त्यांचे नुकसान होत आहे. या अनहितकारक प्रवृत्तिपासून परावृत्त करण्यास त्यांना जातवार प्रतिनिधि देणें अगत्याचें आहे. बऱ्याच निर्विकल्प गृहस्थांनी वरील चिकित्सा कबूल करून जातवार प्रतिनिधीचे तत्व मान्य केलें आहे; परंतु जातवार प्रतिनिधि जरूर असलेल्या जातीस किती प्रतिनिधि द्यावेत या संबंधाचे त्यांचें धोरण अनुदारपणाचें नसलें तरी बेअकलीपणाचें आहे. प्रतिनिधीची वाटणी कशी करावी यासाठी मागें जी वरिष्ठ सरकारने कमिटी नेमिली होती त्या कमिटीच्या रिपोर्टास वरील विधान यथातथ्य लागू पडतें असें म्हटल्यास आमच्या मतें गैर होईल असें वाटत नाही. या कमिटीने आपल्या रिपोर्टात मुसलमान, बहिष्कृत, खिश्चियन, युरोपियन इत्यादी वर्गास जातवार प्रतिंनेधीचें तत्व लावावे अशी शिफारस केली आहे परंतु बहिष्कृत वर्गासारख्या बहुजनसंख्येस मुंबई इलाख्यांत एकच प्रतिगिधि द्यावा असें तिनें सुचविलें होते | व वरिष्ठ सरकारास दया येऊन एकाचा आकडा खोडून त्यांनी दोहोंचा आकडा टाकला आहे ! आकड्यांची फेरफारी जरी झाली तरी कमिटीने एक कां सुचविला अथवा सरकारनें दोन द्या म्हणून कां सांगितलें याची कारणें दोघांपैकी verte सांगितलीं नाहीत. कायदे कौन्सिल जर नुसतें प्रतिनिधिसंग्रहालय असतें तर दरेक जातीचे एकेक दोन-दोन प्रतिनिधि फार झाले, अशा मतास आम्हीं केव्हांच विरोध केला नसता. वस्तुसंग्रहालयाप्रमाणें स्थलानुमानें दरेक जातीचें नमूने म्हणून कोणत्याही प्रकारचें प्रमाण न राखतां