४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नांदण्यास दरेक व्यक्तीस मतदारीचा हक्क मिळून निवडणुकीच्या पद्धतीनें संख्येच्या प्रमाणांत जातवार प्रतिनिधि दिले पाहिजेत: परंतु भावी स्वराज्यांची जी घटना होत आहे त्यावरून असें स्पष्ट होतें आहे कीं, स्वराज्याची वरील व्याख्या ज्यांनी स्वराज्याच्या घटनेंत बराचसा भाग घेतला आहे त्यांना अवगत नसावीसें दिसतें. नाहीं तर मतदारीचा हक्क संकुचित करून जातवार प्रतिनिधीस विरोध करून सामाजिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या ज्या वर्गाचें स्वामित्व आहे त्या वर्गाचें स्वराज्यांत आरोहण करून सामाजिक व आर्थिक दृष्ट्या नागावलेल्या लोकांवर राज्य करण्यास मुबलक अवकाश देणारी स्वराज्याची घटना त्यांनी सुचविली नसती. ज्यांना स्वराज्याच्या नांवाखाली इतरांवर राज्य करावयाचें आहे त्यांना घाटत असलेली स्वराज्याची घटना कबूल असणारच. आम्ही केलेला स्वराज्याचा अर्थ जरी त्यांना नाकबूल करितां आला नाहीं तरी तो अमलांत आणून आपला आत्मघात करून घेण्याइतके खुळे ते नाहींत. म्हणून स्वार्थप्रेरित झालेल्या लोकांनी आम्ही सुचविलेल्या घटनेस जर विरोध केला तर त्यास आम्ही दूषण देऊं शकत नाही. पण आमच्या अर्थानुरूप स्वराज्याची घटना झाल्यानें निदान इंग्रज सरकारावर तर कांही अनर्थ ओढवणार नाही. आमच्या सूचनेप्रमाणे ब्राह्मणेतर व बहिष्कृतांवर होणारें हें राज्य टाळण्यास जर इंग्रज सरकारने मदत केली तर त्यांच्यावर असलेली या वर्गाची श्रद्धा अढळ राहील व ती अढळ रहाण्यात इंग्रजांचाच फायदा आहे. मग आम्ही केलेला अर्थ सार्थ होईल अशी स्वराज्याची घटना त्यांनी कां करूं नये ? अक्कल आणि अंमल यांचा काडीमोड तर झाला नाहीं ना |
अग्रलेख : मूकनायक, ता. २७ मार्च १९२०