४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
करिताहेत तर आम्हांला कांहीं करावयास नको किंवा जें करितात तें बरें आहे असा भास होऊन जे कोणी आमच्यांतील स्वतंत्रतेने, स्वावलंबनानें, व आत्मबलानें समाजाचा गाडा ओढण्यास पुढे येत आहेत ते लो. टिळकांच्या ठायीं लोलुप होऊन कर्तव्यपराङमुख होण्याचा संभव आहे. म्हणूनच लो. शिंद्यास आम्हीं इशारा दिला आहे. आमचा तरणोपाय होण्यास कोणाचीहि पर्वा न बाळगतां बिनदिक्कत आम्हीं आपले हक्क मागितले पाहिजेत. भीक मागून हक्क मिळत नसतात. लो. शिंद्यांना मात्र भीक मागितल्याशिवाय चालणार नाहीं. याचें कारण अस्पृश्यांशीं सहकारिता त्यांना नको. व तशी सहकारिता करण्यास त्यांचा नेहमी विरोधच असतो, हें ज्ञानप्रकाशकारास जरी माहित नसलें तरी आम्हांस पूर्णपणें माहित आहे. सहकार्य करण्याची सुबुद्धि त्यांना होईतोंपर्यत त्यांचें अवतारकृत्य शेवटास जाईल असें वाटत नाहीं. आम्ही जें लिहिलें तें मन दुखविण्याच्या इराद्याने लिहिले नसून केवळ, दिशाभूल झालेल्यास इशारा देणें याच उद्देशानें लिहिलें होते. तो इशारा घेऊन अस्पृश्यांच्या द्वेष्ट्यांशीं सहकार्य न करितां अस्पृश्यांशीं जर त्यांनी सहकार्य केले तर त्यांच्या हातून पुष्कळच कामगिरी होण्यासारखी आहे. परंतु हेतूचा विपर्यास करून मन दुखावल्याबद्दलचा सूड काढण्यास आमच्या कार्यांत विघ्ने आणण्यास लो. शिंदे किंवा इतर कोणीहि उद्युक्त झाल्यास त्यांना मैदान मोकळे आहे ; परंतु अशा धाकानें इशारा देण्याचें आमचें कर्तव्य आम्हीं कधीहि सोडणार नाहीं. टोणग्यांच्या मनधरणीपासून विघ्ने टळणार नसून ती वाढणार आहेत असा आमचा निरोप योग्य कालीं योग्य पुरुषास ज्ञानप्रकाशकार कळवितील अशी आशा आहे.
विविध-विचार : मूकनायक, शनिवार, ता. २७ मार्च १९२०.