१४
मूळ शोधा मग वाद मिटेल.
हा हिंदुस्थान देश जातीभेदानें व धर्मभेदानें कसा ग्रस्त झाला आहे हे कांही नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं. हा जातीभेद व धर्मभेद जोंपर्यंत जारी आहे तोंपर्यंत हिंदुस्थान देश स्वराज्यास नालायक आहे असें मोठ्या आढ्यतेनें सांगून इंग्रज सरकार स्वराज्यावादीयांचें तोंड बंद करीत असे. अगोदर आपल्यांतील जाती व धर्मभेद मोडून टाका मग स्वराज्य मागावयास या असें ब्रिटिश सरकारनें सांगून त्यांचा आजवर सतत हिरमोड केला. जातीभेदामुळें स्वराज्य देऊं नये असें आम्हांस केव्हांच वाटत नव्हतें. ज्यांना स्वराज्य द्यावयाचें होतें त्यांना जातीभेदाची अडचण दूर करण्यास जातवार प्रतिनिधी देऊन स्वराज्य केव्हांहि देतां आलें असतें. पण उशिरा कां होईना ज्या सरकाराला जातीभेदाची मोठी
आड वाटत होती तेंच सरकार स्वराज्य देतांना जातवार प्रतिनिधी देण्यास
विसरणार नाहीं असा ब्राह्मणांस धाक तर ब्राह्मणेतरांस व बहिष्कृतास आशाळूपणा वाटत होता. पण मि. मांटेग्यु साहेबांनीं आपलें मोहनी अस्त्र टाकल्याबरोबर तोच हिंदुस्थान देश स्वराज्याला लायक झाला आहे, इतकेंच नव्हे तर जातवार प्रतिनिधि स्वराज्याला विघातक आहेत अशा मतानें इंग्रज सरकार घेरले गेलें. एकाएकी हा दृष्टीकोन कसा बदलला याबद्दल ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गास फारच विस्मय वाटत आहे. जाती होत्या त्या कांही नाहींश्या झाल्या नाहीं. पूर्वी ज्या आड येत होत्या त्या कोणत्या विचारसरणीमुळे आतां आड येत नाहींत ही विचारसरणीहि आम्हांस अवगत नाही. जाती जाती म्हणून ओरड करणाऱ्या सरकारास जातवार
प्रतिनिधी विरुद्ध झालेल्या प्रबल ग्रहापासून सोडवितां सोडवितां ब्राह्मणेतरांच्या व बहिष्कृतांच्या नाकीं नऊ आले, व आतां मोठ्या कष्टानें कोठें कोठें अपवाद म्हणून जातवार प्रतिनिधी देण्यास सरकार कबूल झालें आहे. अशा प्रकारें नजरबंद झालेल्या सरकारास शुद्धीवर आणण्यास जातीभेद आहे त्याकडे कानाडोळा करूं नका व जातवार प्रतिनिधी देऊन होणारा अनर्थ टाळा असा कंठशोष करून सांगणाऱ्यांना स्वराज्यवादी लोक देशद्रोही, आत्मघातकी इत्यादि शेलक्या शब्दांनी संबोधित आहेत. जी इंग्रजी नौकरशाही जातिभेदामुळें हिंदुलोक स्वराज्यास अपात्र आहेत असें म्हणत होती त्याच नोकरशाहीकडून स्वराज्य विषयींच्या पात्रतेचे हिंदुलोकांचे हकक कबूल होण्याची वेळ आली असतां समाजांत ब्राह्मण ब्राह्मणेतर इत्यादि विनाकारण दुफळी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे असा