४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आपला गैरसमज करून घेऊन अनेक दिवस दाबून धरलेला क्रोधानलाचा लोट केसरीकारांनी आपल्या ता. १६-३-१९२० च्या ज्वालामुखी अग्रलेखांतून सोडला आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर या वादांत केसरीकारांना जी मौज वाटत आहेती ही की, “हिंदी प्रजाजन स्वराज्यास पात्र असून त्यांना स्वराज्य मिळावें म्हणून काँग्रेसनें किंवा होमरूल संस्थांनी उपस्थित केलेल्या चळवळीत यांनी विशेषसा भाग घेतला नाहीं, किंवा घेतला असल्यांस आंगचोरपणानें घेतला व केव्हां केव्हां तर उघड विरोधहि केला अशा लोकांनी हें बंड उभारण्यास सुरवात केली आहे. ब्राह्मणांच्या व इतरांच्या दृष्टिकोनांत जो एक महत्त्वाचा फरक आहे तो जर केसरीकारांनी ओळखला असता तर त्यांना या वादांत म्हणतात तशी मौज वाटती ना. ब्राह्मणांना स्वराज्य कसें मिळेल हा प्रश्न काय तो प्रधान वाटतो. म्हणून त्यांनीं मतदारीचा हक्क कोणाला असावा अगर प्रतिनिधी कसे निवडून यावेत याबद्दल तोंड उघडून शब्द दोष देखील करून घेतला नाहीं. कारण कांही जरी झालें तरी ब्राह्मण प्रतिनिधी निवडून येणारच. इतरांना मात्र स्वराज्य मिळालें तर त्यापासून प्राप्त होणारी स्वयंसत्ता सर्व जातींत कशी विभागतां येईल कीं जेणेंकरून स्वराज्य म्हणजे ब्राह्मणी राज्य होणार नाही हा प्रश्न प्रधान वाटतो. म्हणून ते मतदारीच्या हक्काची व प्रतिनिधी निवडण्याच्या पद्धतीची अहोरात्र चर्चा करित आहेत, स्वराज्य मागितलें नाहीं याचें कारण एवढेच कीं जोंपर्यंत जाती आहेत तोंपर्यंत स्वराज्य मिळणार नाही असें इंग्रज सरकार अधिकारयुक्त वाणीनें सांगत होते. म्हणून जातीभेद काढून टाका ही मागणी
आज अनेक दिवसांपासून आम्ही ब्राह्मण लोकांपाशी करीत होतो. परंतु
जातिभेदहि गेला नाहीं व जातवार प्रतिनिधीहि मिळत नाहींत अशी जेव्हां बिकट वेळ येऊन ठेपली तेव्हां मात्र ब्राह्मणाप्रमाणें ओढून कातडें डोळ्यांवर घेऊ इच्छिणाऱ्या इंग्रजांस जातिभेदाच्या स्वरूपाची जाणीव करून देण्यास हिंदू समाजाचें ब्राह्मण ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग करावें लागलें. हैं वर्गीकरण अगदीं शाब्दिक व कृत्रिम आहे असें केसरीकारानें सिद्ध करण्याचा आव घातला आहे. लो. टिळकांनींहि ब्राह्मण ब्राह्मणेतर या विषयावर पुण्यास एक व्याख्यान दिलें. त्यांतहि ब्राह्मणेतरांत ऐक्याची भावना नाही असा अज्ञानपणाचा वाद लढविला आहे. हिंदु समाजाची रचना जन्मसिद्ध आहे गुणसिद्ध नाहीं; व जन्मसिद्ध योग्यायोग्यता व जन्मसिद्ध पवित्रापवित्रता या दोन मूलतत्वाच्या पायावर समाजाची रचना झाली आहे हें केसरीकारहि नाकबूल करणार नाहींत. जन्मसिद्ध योग्यता व पवित्रता या दोन तत्वानुसार जर आपण हिंदुसमाजाचें वर्गीकरण केलें तर त्याचे तीन वर्ग होतात. सर्वांत योग्यतेनें श्रेष्ठ व सर्वात पवित्र असा वर्ग म्हटला म्हणजे ब्राह्मणवर्ग होय. ज्यांची जन्मसिद्ध