५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खिळल्यामुळे ब्राह्मणेतरांची व बहिष्कृतांची कशी नागवणूक झाली आहे याची जसजसी ओळख पटत जाईल तसतसें हे भेद दृढ होऊन राष्ट्रकार्यात विघ्ने येतील हें केसरीकाराप्रमाणें आम्हासहि कबूल आहे. परंतु ज्या कारणामुळें वाद निघाला तीं कारणें दूर केल्याशिवाय वाद मिटवा म्हणून सांगणें किंवा तो मिटत नाही म्हणून डोक्यांत राख घालून वाद करणारास शिव्याशाप देणें अनुचित आहे. ब्राह्मणांच्या जन्मसिद्ध aad व पवित्रतेमुळें गुणसिद्ध ब्राह्मणेतरांचे व बहिष्कृतांचे किती नुकसान झालें आहे याबद्दल केसरीशिवाय इतर कोणालाच शंका येणे शक्य नाही. तरीपण हा वाद मिटून समाजांत ऐक्य व्हावें अशी जर केसरीची प्रामाणिक इच्छा असेल तर ब्राह्मणांनी इतरांस बुडविलें नाही अशी इतिहासविरुद्ध केसरीची मनोदेवता केसरीला साक्ष देत असली तरी ज्याअर्थी इतर लोक ती खोटी आहे असा गिल्ला करीत आहेत त्याअर्थी या वेड्यापीरांच्या म्हणण्यांत कांहीं तरी राम आहे असा संशय घेऊन जरी ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत या वादग्रस्त प्रश्नांच्या मुळाशीं असलेली कारणें चोखाळून पाहिल्यास केसरी सज्ञान होऊन पुढें म्हटलेला अग्रलेख हा वाद कसा मिटवावा या विषयावर आल्याने ब्राह्मणेतरांत व बहिष्कृतांत केसरीचा जितका मान राहील व खप होईल तितका तो मिटवावा. असें लिहून होणार नाही हें जाणूनच केसरीकार या महागाईच्या दिवसांत आपली शाई, कागद व बुद्धिमत्ता खर्च करतील एवढी आशा केल्यास फार होईल काय ?
विविध विचार : मूकनायक, शनिवार ता. २७ मार्च १९२०.
डब्ल्यू-२०७३-४ ब