20
दरोडेखोर धर्माभिमान
बिजनोरा जिल्ह्यांतील देवगड नांवाच्या गांवीं ता. ९ फेब्रुवारी १९२९ रोजीं अस्पृश्य वर्गांतील एका लग्नाची मिरवणुक निघाली असतांना तिला उच्च जातीचे असें म्हणविणाऱ्या हिंदुकडून विरोध करण्यांत आला. हा विरोध साधारण स्वरूपाचा नव्हता. तर सदरहू मिरवणुकीला अडथळा करणाऱ्या उच्च हिंदूंची मजल अत्याचारापर्यंत जाऊन त्यांनीं त्या समारंभांतल्या अस्पृश्यांवर दरोडा घातला आणि त्यांची चीजवस्तू पार लुबाडली ! हा प्रकार घडून आला त्या वेळीं गांवचा पटवारीहि तेथें हजर होता म्हणतात ; पण स्थानिक अधिकाऱ्यांकडून या अत्याचाराची अद्यापि दाद घेण्यांत आली नाहीं ! सध्या हें प्रकरण दिल्लीच्या
- श्रद्धानंद दलितोद्धार सभेनें हातीं घेतलें असून तिच्या मुख्य चिटणीसांनीं यासंबंधीं बिजनोरच्या कलेक्टराकडे तारेंने दाद मागितली असल्याचें समजतें. सभेनें आपला एक प्रतिनिधीहि प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करण्यासाठीं समक्ष पाठविला होता. त्याजकडून एकंदर वस्तुस्थिती खरी असल्याचा रिपोर्ट आहे. बहिष्कृत मानलेल्या वर्गातील लोकांच्या लग्नाच्या मिरवणूकींना अडथळे करणें हा उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या हिंदूंचा सनातन संप्रदाय आहे. अस्पृश्यांच्या मिरवणुकींनीं आपलें नाक कापलें जातें अशी या धर्माभिमानी लोकांची समजूत आहे. परंतु परधर्मीय लोकांच्या लग्नाच्या मिरवुणकींना ते अडथळा करावयाला धजत नाहीत इतकेंच नव्हे तर वाजंत्र्यांचीं वगैरे कामेही करितात. अस्पृश्यांच्या मिरवणुकीचा व अगदी जुन्यात जुन्या मताच्या धर्माचाही संबंध कसा येतो तें समजणें कठीण आहे. ज्या रस्त्यांवरुन एकट्या दुकट्या किंवा दहा पांच अस्पृश्यांना जाता येते त्या रस्त्यांना मिरवणुकीनेंच विटाळ होतो असें नाही. यांत विटाळाचा प्रश्न नसून अस्पृश्य वर्गाला आनंद होत असलेला पाहूनही उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या हिंदूंना विषाद वाटतो. जणूं काय अस्पृश्यांच्या लग्नाची मिरवणुक म्हणजे यांच्या सनातन धर्माची प्रेतयात्राच ! वरील उदाहरणांत, दरोडा हा एक नवीन विशेष आहे. धर्माच्या नांवाखालीं लुटारू गुंडांना ही चांगलीच संधि मिळाली म्हणावयाची. इतके झालें तरी अस्पृश्यांना शांतिपाठ शिकविण्यास मानभावी पुराणमतवादी तयारच असतात आणि उलट अस्पृश्यांवरच अत्याचाराचा आरोप करतात.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ मार्च १९२९.