हिंदुधर्माला नोटीस - Page 104

६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आपलेपणा त्यांना कां वाटावा ? शेळ्यांना लांडग्या विषयीं आपलेपणा वाटणें कधीं तरी संभवनीय आहे काय ? हिंदुसमाजाविषयीं नाहीं, परंतु हिंदुधर्माविषयी मात्र त्यांना आपलेपणा अद्यापि वाटतो हें खरें आहे. व त्याचे कारण एवढेंच कीं, तो त्यांच्या पूर्वजांचा धर्म आहे व त्या धर्मामध्ये ते लहानाचे मोठे झाले आहेत. परंतु एवढ्याच कारणास्तव वाटणारा आपलेपणा त्यांना हिंदुसमाजांत कायम ठेवण्यांस पुरेसा नाही. धर्म वेगळा व समाज वेगळा, धर्माचें नियम समाजांत नडत नाहीत व सामाजिक निर्बध धार्मिक बाबतींत आड येत नाहींत, असें थोडेच आहे. हिंदुधर्म व हिंदुसमाज यांचा परस्परांशी अगदीं निकट संबंध आहे, एवढेच नव्हे तर ते एकजीव आहेत. इतर धर्म सामाजिक बाबतींत अशा प्रकारें ढवळाढवळ करीत नाहींत, परंतु सामजिक बाबतींत ढवळाढवळ करणें, सामाजिक आचारविचाराचे नियंत्रण करणें हा हिंदुधर्माचा विशेष आहे. - खावें काय, Wed काय, उठावें कसें, बसावें कसें, निजावें कसें? असल्या गोष्टींतसुद्धां धर्माचे नियम आहेत. ईश्वर व मनुष्य यांच्यामधील संबंध आणि ठोकळ नीत्तीनियम इतक्यांपुरतेच इतर धर्माप्रमाणे हिंदुधर्मानें आपले कार्यक्षेत्र मर्यादित केलेलें नाही, हिंदुधर्माप्रमाणे दुसऱ्या कोणत्याहि धर्मात इतके सामाजिक निर्बध नाहींत. जातिभेद हा हिंदुधर्मामध्ये एक और प्रकार आहे. दुसऱ्या कोणत्याहि धर्मामध्ये ही अजबचीज सांपडावयाची नाहीं. आणि जातिभेदांतहि अस्पृश्यता हा जो प्रकार आहे त्याला तर जगात दुसरीकडे कोठेच तोड सांपडावयाची नाही. सामाजिकभेद इतरत्र असतील आणि अस्पृश्यतेचे पर्यायहि इतरत्र सांपडतील. परंतु हिंदुसमाजांत त्या भेदावर व अस्पृश्यतेवर

धर्माचा शिक्का

बसलेला आहे! म्हणून हिंदुसमाजात धार्मिक सुधारणेखेरीज सामाजिक सुधारणा होणें शक्य नाहीं. हिंदुसमाजाला नोटीस म्हणजे हिंदुधर्मालाच नोटीस आहे. सध्या अस्पृश्य समजले जाणाऱ्या वर्गातल्या लोकांनीं हिंदुसमाजांत रहावें, हिंदुसमाजाबाहेर जाऊन स्वतःचा तरणोपाय पहावा याचा निकाल हिंदुधर्माची सुधारणा इष्ट दिशेनें करण्यावरच अवलंबून आहे. तशी सुधारणा करणें हैं बहिष्कृत वर्गाच्या हातीं नाहीं. स्वतःला उच्च वर्णीय 'म्हणविणाऱया लोकांनीं मनावर घेतले तरच ही गोष्ट होणार आहे. परंतु स्वत:च्या कृत्रिम उच्चपणाला सोडल्यावाचून त्यांच्या हातून खरी धार्मिक व सामाजिक सुधारंणा होणे शक्य नाहीं. उच्चवर्णीय म्हणविणारे लोक आपली वतनदारी कायम ठेवू पहात असल्यामुळे हिंदुसमाजांतील जातींजातींमध्यें सामनें होत आहेत व अस्पृश्यतेचे बंड मोडत नाहीं. बहिष्कृत वर्गातल्या लोकांनी धर्मातराचा प्रश्‍न काढला म्हणजे