पुण्याची मिश्र वसाहत - Page 113

२४
पुण्याची मिश्र वसाहत

पुण्याच्या म्युनिसिपालिटीनें तेथील नदीकिनाऱ्यावर सरकारी नोकरांच्या वसाहतीला लागून, तीन एकर जमिनींत सर्व जातींच्या ऐंशीं कुटुंबांची एक वसाहत स्थापण्याचे ठरविलें आहे. ब्राह्मण वगैरे जातींची व॒ अस्पृश्य मानलेल्या जातींचींहि कुटुंबे या वसाहतींत असणार आहेत. स्वच्छतेसंबंधाची जबाबदारी तेथल्या को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीनें पतकरली असून शौचकूप वगैरेंची व्यवस्था घराघराकरितां वेगळी न करतां समाईक पद्धतीची करण्यांत यावयाची आहे. या योजनेला कांही सरकारी अधिकारी व श्रीमंत लोक यांनीं म्युनिसिपालिटींत कसून विरोध केला, परंतु बहुमताने ती पसंत ठरली. म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसर यानीं या योजनेच्या बाबतींत प्रशंसनीय उत्साह दाखविला आहे. हा एक प्रयोग आहे असें मानून त्या योजनेचे पुरस्कर्ते चालले आहेत, परंतु तो प्रयोंग यशस्वी कां होऊं नये तें आम्हांस समजत नाही. अस्पृश्यांच्या वेगळ्या वसाहंती काढल्यानें अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणार नाही. अस्पृश्यता नाहींशी करण्यास सामाजिक दळणवळण हेच विशेष उपयोगी आहे. इतर लोकांच्या वस्तीत राहावयास मिळाल्यार्ने अस्पृश्यांची राहणी सुधारण्यास साहाय्य होईल आणि प्रत्यक्ष सहवासानें पुष्कळ गैरसमज दूर होतील. इतरं समाजापासून अलग केल्यामुळेंच बहिष्कृत समाजाची राहणी बिघडली आहे. शिवाय, एकाच ठिकाणी निरनिरात्ब्या जातींची मुलें बसतील, उठतील, खेळ खेळतील व त्यामुळे पुढील पिढींत तरी आजचा निरनिराळ्या जाती मधील दूरभाव दिसणार नाही. चीफ ऑफिसर व या योजनेला पाठिंबा देणारे म्युनिसिपालिटीचे सभासद यांना या प्रत्यक्ष

सुधारणेच्या उपाययोजनेबद्दल आम्ही मनःपूर्वक धन्यवाद देतों.

प्रासांगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ मार्च १९२९.