हिंदु महासभा व अस्पृश्यता - Page 120

७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बुद्धानें जातिभेदाचा निषेध केला, धर्मकांडाचा फोलपणा प्रतिपादिला, तरी सुद्धा हिंदुसमाजानें त्याला देवाचा एक अवतार बनवून त्याची शिकवण तेवढी अचूक धाब्यावर बसविली ! आज म. गांधींशीं हिंदुसमाज तेंच वर्तन करीत आहे. आपल्या महाराष्ट्रांतील गांधीपंथी लोकांकडे दृष्टी फेकली तर आपल्याला काय दिसून येतें? म. गांधींच्या कितीशा महाराष्ट्रीय अनुयायांनी अस्पृश्यतानिवारणासाठीं मनःपूर्वक प्रयत्न केलें आहेत ? प्रयत्न केले नाहींत इतकेंच नव्हे तर अस्पृश्यतानिवारणाच्या प्रयत्नांना विरोध करण्यासही त्यांतल्या बहुतेकांनी कमी केलेलें नाही. मोठमोठ्या. धर्मसुधारकांना व समाजसुधारकांना आपल्या पोटांत जिरवून टाकण्याची जी हातोटी हिंदुसमाजाला पुरातन काळापासून साधलेली आहे ती लक्षांत घेतली म्हणजे मात्र रामानंद चतर्जीसारख्या एका कट्ट्या ब्राह्मसमाजिस्टाला हिंदुमहासभेचें अध्यक्षस्थान देण्यांत आलें याबद्दल तितकेंसें आश्चर्य वाटावयास नको. हिंदुसमाजाच्या पोटांतील वडवानळांत बुद्ध खाक झाला, महावीर खाक झाला, बसव खाक झाला, चैतन्य खाक झाला, रामानंद खाक झाला, महानुभावांचा चक्रधर खाक झाला, व भागवत संप्रदायी साधुसंत खाक झाले ! नानक व कबीर यांचीहि तीच वाट लागली. राममोहन, दयानंद, रामकृष्ण परमहंस, विष्णुबुवा ब्रह्मचारी, जोतीबा फुले, रानडे, भांडारकर, विवेकांनंद, रामतीर्थ, श्रद्धानंद, लजपतराय याची तीच वाट हिंदुसमाजानें लावलीं किंवा तो लावूं पाहत आहे. म. गांधी, आचार्य राय, रामानंद चतर्जी यांनाहि पचवून टाकूं अशी हिंदुसमाजाला धमक वाटत आहे. व्यक्तीचे माहात्म्य वाढवावयाचे व तिचीं आपल्यास नको असेल ती शिकवण कितीहि चांगली असली तरी तिच्याकडे बिलकूल लक्ष्य द्यावयाचें नाहीं, आपला पूर्वीचा परिपाठ चालूच ठेवावयाचा, ही कला हिंदुसमाज़ाला उत्कृष्ट प्रकारें साध्य झालेली आहे. . पूर्वीच्या वैष्णवपंथी रामानंदाचा उदारमतवाद ज्यानें निष्क्रिय करून टाकला तोच हिंदुसमाज हल्लींच्या ब्राह्मपंथी रामानंदाचा उदारमलवाद निष्क्रिय करून टाकण्याची धमक बाळगत असल्यास त्यात नवल तें कोणतें ? हिंदुसमाज म्हणजे फ्रान्सच्या बर्बून राजघराण्याप्रमाणे कांही शिकत नाहीं व कांहीं -विसरत नाहीं (learns nothing and forgets nothing ) हिंदुसमाज इतका कोडगा असला तरी त्याच्या अंगी आपल्या अस्तित्वाचे तात्पुरतें संरक्षण करण्याइतका लवचीकपणा आहे हेंही मात्र कबूल केलें पाहिजे. पर्याय शोधून काढण्यांत हिंदुधर्मातल्या शास्त्रीपंडितांचा कोणी हात धरूं शकणार नाहीं. वेळ पडेल