पुनः शाळांतलीं पाणी पिण्याची भांडी ! - Page 126

30

पुनः शाळांतली पाणी पिण्याची भांडी |

मुंबई म्युनिसिपालिटीनें आपल्या शाळांमधील मुलांमुलींकरितां ठेवलेलीं पाणी पिण्याची भांडीं स्पृश्यांकरितां वेगळीं व अस्पृश्यांकरितां वेगळीं अशीं ठेवूं नयेत असें ठरविल्यापासून पुराणमतवाद्यांना झोंप येईनाशीं झाली आहे. सदरील ठराव रद्द करून घेण्यासाठीं अद्यापि त्यांची धडपड चालली आहे. या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न नवीन कॉर्पोरेशनच्या सभेत नुकताच झाला आणि त्या वेळीं पुराणमतवाद्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सदरील ठराव रद्द करण्यासाठीं भांडणाऱ्या सभासदांमध्ये गुजराथी लोकांचा भरणा विशेष होता आणि विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं बाळभाई देसाई, मोहनलाल देसाई वगैरे कांहीं कट्टे काँग्रेसवालेहि त्यांमध्यें होते ! दक्षिणी सभासदांपैकी डॉ. जावळे यांनी या वादांत अस्पृश्यांच्या विरुद्ध जोरानें भाग घेतला होता. शिंगें मोडून वासरांत शिरणाऱ्या गाईप्रमाणें वागणाऱ्या या लोकांची अखेरीस फजिती झाली ही समाधानाची गोष्ट होय.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १२ एप्रिल १९२९.