पुनः सर्व गिरण्यांचा संप | - Page 135

पुनः सर्व गिरण्यांचा संप ९३ घेतल्यावाचून गैरहजर राहिला होता व त्याचें कारण दहा नंबरचें सूत त्या वेळी खात्यांत चालू होतें आणि बारीक सूत पुनः चालू झाले तेव्हां तो कामावर परत आला व आपले पूर्वीचे सांचे मागूं लागला, परंतु त्याच्या गैरहजेरींत दुसरा इसम त्याच्या साच्यावर कायमचा नेमला होता म्हणून ते सांचे त्याला देतां येणें शक्‍य नव्हतें. असें मालक म्हणतात तर उलटपक्षी युनियनवाले म्हणतात कीं, तो इसम रजा घेऊनच गैरहजर राहिला होता, परंतु तो ह्या गिरणीतला पुढारी असल्यामुळें त्याला मुद्दाम कामावर घेतलें नाहीं. गिरण्यांत रजेसाठीं लेखीं अर्ज करण्याची व रजा दिल्यास दाखला दप्तरीं ठेवण्याची पद्धती नसल्यामुळें मालकाचे म्हणणें खरें की युनियनचे म्हणणें खरें तें ठरविण्यास लेखी पुरावा कांहींच नाहीं. उभयपक्षी जो पुरावा आहे तो तोंडीच आहे. काहीं झालें तरी अठरा माणसांसाठी सोळा हजार माणसांचा संप करण्यांत चूक झाली हें स्पष्ट आहे. इतकेंच नव्हे तर युनियनचे त्या वेळचे पुढारी डांगे, आळवे व कासले यांनीं मोरबाग गिरणीच्या गेल्या नोव्हेंबर मधल्या संपांत मालकाला करार लिहून देऊन, कामगारांची कांहीं तक्रार असल्यास ती प्रथम मालकापुढे रीतसर मांडून दाद मिळण्याची निराशा झाल्याखेरीज संप करणार नाहीं अशी अट जॉबर व कामगार यांच्यातर्फे कबूल केली होती. या कराराच्या अस्सल कागदाचा फोटोहि मालकांनी प्रसिद्ध केलेला आहे. परंतु मोरबागचा संप अगोदर मालकाँपुढें तक्रार मांडल्यावाचून करण्यांत आला. ही चूक झाल्याची कबुली युनियनच्या हल्लींच्या पुढाऱ्यांनी मालकांपाशीं थोड्या दिवसांपूर्वी झालेल्या वाटाघाटीत दिली आहे. म्हणजे युनियनच्या पुढाऱ्यांनी एकामागून एक अशा घोडचुका केल्या आणि आतां. दीडलाख लोकांवर व त्यांच्या कुटुंबावर -उपासमारीचा प्रसंग आणून त्या चुकांवर पांघरून घालण्याचा आणि कामगारांना झुलविण्याचा त्यांनीं प्रयत्न चालविलेला आहे.

प्रासंगिक. विचार : बहिष्कृत भारत, ता. ३ मे १९२९.

TIRY- @