| 34 ह |
बहिष्कृत वर्गातील कामगारांचा कोंडमारा
बहिष्कृत वर्गातली हजारों माणसें गिरण्यांत कामावर आहेत. पुरूषांचा भरणा मुख्यतः त्रासन खात्यांत आहे. कपडा खात्यांत अस्पृश्येच्या सबबीवर त्यांना मज्जाव करण्यात येतो. त्रासन खात्यांत पगार अगदीं लहान आणि त्याच्या दुपटीचौपटींनें कापड खात्यांत पगार मिळतात हें प्रसिद्धच आहे. बहिष्कृत वर्गातल्या गिरणीकामगारांना सरासरी मानानें दरमहा वीस रूपयांपेक्षा अधिक पगार मिळत नाहीं. अर्थातच् या पगारांतून बचत करणें जवळजवळ अशक्यच असतें. त्रासन खात्यांतल्या कामगारांना दाणेवाल्या' व्यापाऱ्याकडून उधारीनें माल मिळत नाहीं. अर्थात् संपात टिकाव काढण्यांचें त्राण त्यांच्या अंगी बिलकूल नसतें. त्यांतहि गेल्या वर्षदीडवर्षातल्या संपामुळें आधिंच नाकींनऊ आलेले आहेत. 'यावर्गातल्या लोकांना कर्ज काढावयाचे झाल्यास पठाणांखेरीज दुसरा कोणी सावकार सांपडत नाहीं. पठाणाचें कर्ज काढावयाचे म्हणजे दरमहा दर रुपयामागें चार आणे व्याज द्यावयाचें. शिवाय पठाणांच्या कर्जामुळे अब्नुवर केव्हां घाला पडेल याचा नेम नसतो. गिरण्यांत कामावर जाणाऱ्या पुष्कळ बायकांना संपांतली उपासमारी टाळण्यांसाठीं पठाणांचें कर्ज घेण्याचा प्रसंग येतो आणि त्याचे परिणाम पुढें भयंकर होतात. याची यूनियनच्या पुढाऱ्यांना आणि त्यांच्या नादास लागलेल्या कापड खात्यांतल्या भक्कम पगाराच्या इतर हिंदूना जाणीव नाहीं व जाणीव असली तरी त्याची पर्वा वाटत नाहीं. युनियनपासून कामगारांना दोन पैसे अधिक मिळाले पाहिजेत, त्यांची स्थिती सुधारली पाहिजे, परंतु कम्युनिस्टाच्या--लालबावटेवाला म्हणून ओळखल्या ` जाणाऱ्या यूनियनच्या--पांचवीलाच संप पूजलेला असल्यामुळें -गिरणीकामगारांना -दोन पैसे अधिक मिळण्यांच्याऐवजी त्यांची सांपत्तिक स्थिति दिवसेंदिवस खालावत आहे. संप केव्हां व कशाकरितां करावयाचा याविषयी कांहीं ताळतंत्रच उरलेला नाहीं हे इतर वर्गातल्या कामगारांना तूर्त कळत नाहीं म्हणून बहिष्कृत वर्गातल्या कामगारांनी त्यांच्याबरोबर नाचून कसें चालेल? बहिष्कृत वर्गातल्या कामगारांमधल्या पुष्कळजणांनी आपली ही स्थिति निवेदन केल्यामुळें डॉ. आंबेडकरांना हा प्रश्न हातीं घेऊन बहिष्कृत वर्गातल्या गिरणीकामगारांचें वाह्यात् चळवळीपासून संरक्षण करणें भाग पडलें आहे.
७ ७७
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ३ मे १९२९.