319
शंकराचार्य कीं प्रतिसंकराचार्य
करवीर पीठाचे माजी शंकराचार्य 'डॉ.' कुर्तकोटी हे हिंदुसंघटना व शुद्धि या चळवळींचे पुरस्कर्ते असूम परवां सुरत येथें हिंदुमहासभेच्या अधिवेशनाबरोबर भरविण्यांत आलेली शुद्धिपरिषद त्यांच्याच अध्यक्षतेखालीं भरबिण्यांत आली होती*. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून भाषण करतांना कुर्तकोटींनीं असें प्रतिपादलें कीं, हिंदुसमाजांत जातिसंकर होऊं नये याकरितां शुद्धिकृतांची एक वेगळी जात करण्यांत यावी. खाशी तोड! बाकी हिंदुसमाज जर जातीभेदाला चिकटून राहणार तर शुद्धिकृत लोक तरी जातिभेद सोडून आपसांत रोटीबेटीव्यवहार करावयाला कां तयार होतील ?- म्हणजे जितक्या हिंदुसमाजांत जाती तितक्या शुद्धिकृत मंडळींत निर्माण व्हावयाच्या ! अशा स्थितींत 'शुद्ध' होण्याला तरी कोण तयार होईल? व एकादा वेडा पीर निघाला, तरी तो किती दिवस टिकाव काढूं शकेल? अशानें हिंदुसंघटन छान होईल! कुर्तकोटीना शंकराचार्य म्हणवून घेण्याची हौस आहे, परंतु त्यांना 'प्रतिसंकराचार्य' असें म्हणणें विशेष उचित होईल, वाटल्यास 'प्रतिवादी भयंकर' अशी पदवी धारण करणारे एक मठाधीश आहेत. त्यांच्या पदवीच्या चालीवर 'संकर भयंकर' अशी पदवी द्यावी. कुर्तकोटी हिंदुधर्माच्या प्रसारार्थ युरोप अमेरिकेंत जाऊं पहात आहेत म्हणून विजयी मराठ्यानें त्यांना जगद्गुरूच्या ऐवजीं "जगत् fire’ असें म्हणावें म्हणून सुचविलें आहे. आम्ही त्यांत थोडी भर घालून 'संकटभीरु जगत् फिरु' अशी पदवी त्यांना बहाल करतो.
*ही परिषद शुक्रवार, ता. २९ मार्च १९२९ रोजी भरली होती.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ३ मे १९२९.